Maharashtra Police | (File Photo)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर स्वत:सह परिवाराची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरनाग्राग्रस्त रुग्णांवर जसे वैद्यकिय कर्मचारी उपचार करत आहेत. त्याचप्रमाणे पोलीस दलातील कर्मचारी सुद्धा अहोरात्र रस्त्यावर गस्त घालून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. याच दरम्यान पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना सुद्धा कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. तर आता विले पार्ले येथे कार्यरत असणाऱ्या एका हेड कॉन्स्टेबल यांचे कोरोना व्हायरसमुळे निधन झाल्याची घटना समोर आली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणी दुख व्यक्त केले आहे.

हेड कॉन्स्टेबल अरुण फडतरे असे त्यांचे नाव आहे. अरुण फडतरे यांचे कोरोनामुळे निधन झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी ट्वीटरद्वारे दिली आहे. तर फडतरे यांच्या निधनामुळे डीजीपी आणि सर्व स्तरातील पोलीस कर्मचाऱ्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. तसेच त्यांच्या आत्मला शांती लाभो अशी सुद्धा प्रार्थना केली आहे. गुरुवारी सुद्धा पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. आतापर्यंत 10 पेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचे निधन कोरोनामुळे झाले आहे.(खाजगी रुग्णालयातील 80% बेड्स कोविड 19 रुग्णांसाठी राखीव, उपचारांचे दरही निश्चित; राज्य सरकाराचा महत्त्वपूर्ण निर्णय)

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या 48 तासात 278 पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे एकूण 1666 जणांचा कोरोनाचे संक्रमण झाले असून त्यापैकी 1177 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 473 जणांची प्रकृती सुधारली असून 16 पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आली आहे.