मुंबईतील चेंबूर (Chembur) परिसरात एका 19 वर्षीय तरुणीवर चार जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याच्या घटनेने काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यभर खळबळ माजली होती. अशातच काल औरंगाबाद (Aurangabad) येथील घाटी रुग्णालयात या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजत आहे. या धक्कादायक घटनेनंतर सर्व स्तरावरून शोक व संताप व्यक्त केला जात असून मुलीच्या कुटुंबाने पीडितेच्या मृत्यूसाठी जबाबदार आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह न स्वीकारण्याचा निर्धार केला आहे. परिणामी दोन दिवसांपासून या तरुणीचा मृतदेह रुग्णालयाच्या शवाघरात पडून आहे.
IANS च्या सूत्रांनुसार, संबंधित तरुणी ही मुळतः जालना जिल्ह्यातील रहिवाशी असून दोन महिन्यांपूर्वी मुंबईतील चेंबूर येथे नातेवाईकनाकडे आली होती. 7 जुलै रोजी मैत्रिणीच्या वाढदिवसाला जात असल्याचे सांगून ती घराबाहेर पडली मात्र सेलिब्रेशन नंतर घरी परतत असताना चार ते पाच अज्ञात तरुणांनी जबरदस्ती करत लाल डोंगर परिसरात तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर दुसर्याच दिवशी मुलगी आपल्या घरी परतली मात्र घाबरून हा प्रकार सर्वांपासून लपवून ठेवला. काही दिवसांनी तिची तब्येत ढासळू लागल्यावर वडिलांनी तिला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालायत दाखल केले, जिथे मुलीवर बलात्कार झाल्याचे उघड झाले. (मानखुर्द परिसरात सामुहिक बलात्काराचा प्रयत्न, पोलिसांनी दोन संशयितांना घेतले ताब्यात)
दरम्यान, अनेकदा तिची प्रकृती हुलकावणी देत होती मात्र काल अखेरीस तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या तरुणीच्या मृत्यूची माहिती मिळताच मुंबई पोलीस उपनिरीक्षक व टीम औरंगाबाद येथे दाखल झाली असून याप्रकरणी तपास करत आहे. तसेच , महाराष्ट्र राज्य महिला आयोगतर्फे याप्रकरणी चुनाभट्टी पोलीस स्थानकाला 31 ऑगस्ट पर्यंत अहवाल तयार करण्याची ताकीद देण्यात आली आहे मात्र तरुणीच्या कुटुंबांने आधी अटक मग पोस्टमार्टम असा पवित्र स्वीकारल्याने या घटनेला गंभीर रूप आले आहे.
दरम्यान, यानंतर राजकीय पक्षांसह अनेक स्तरावरून संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करत काल चुनाभती ते चेंबूर दरम्यान मोर्चा काढला होता. तर सुप्रिया सुळे, नवाब मलिक यांच्यासह अनेक नेत्यांनी पोलीस निर्देशक सुबोध जैस्वाल यांच्याकडे पीडितेच्या कुटुंबाला सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली होती.