26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात अनेक ठिकाणचे बॉम्ब शोधून बेधडक कारवाई करणाऱ्या माजी मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया (Rakesh Maria) यांनी आपल्या Let Me Say It Now या नव्या पुस्तकातून शीना बोरा हत्याकांड व कसाब (Kasab) च्या बाबत काही मोठे खुलासे केले आहेत. मारिया हे स्वतः शीना बोरा हत्याकांडाचा (Sheena Bora Murder Mystery) तपास घेत असताना त्यांच्यावर या खटल्यातील आरोपी पीटर मुखर्जी (Peeter Mukharjee) यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप लावून त्यांची बदली करण्यात आली होती. या प्रकरणात मारिया यांनी त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना सुद्धा चुकीची माहिती देऊन पीटर मुखर्जी यांना वाचवण्याचे प्रयत्न केले असे तेव्हा समोर आले होते. मात्र या आरोपांवर खुलासा देत मारिया यांनी आपल्या पुस्तकातून भाष्य केले आहे.
राकेश मारिया यांनी पुस्तकात लिहिल्यानुसार, त्यांच्यात आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गैरसमजुती झाल्या होत्या, फडणवीस यांना अन्य कोणीतरी मारिया यांच्या वतीने पीटर मुखर्जी बद्दल माहिती देत पीटर हे या प्रकरणात निर्दोष असल्याचे सांगितले होते. माध्यमातील काही वृत्तात सुद्धा फडणवीस यांनी याची पुष्टी केली आहे, तसेच राकेश यांनी आपल्यात आणि फडणवीस यांच्यात केवळ एकदाच याप्रकरणी संवाद झाल्याचे सांगितले, ज्यात त्यांनी जेव्हा शीना बोरा यांची हत्या झाली तेव्हा पीटर हे देशात नसल्याची माहिती दिली होती, मात्र पीटर दोषी नाहीत यासंदर्भात कोणतेही विधान केले नव्हते, हे प्रकरण शेवटच्या टप्प्यात पोहचले तेव्हा मारियांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचे स्पष्टीकरण देण्यात येईल असे सरकारतर्फे सांगण्यात आले होते, इतकेच नव्हे तर त्यांना बढती देण्याची सुद्धा चर्चा होती मात्र अचानक त्यांचना बढती ऐवजी बदली देण्यात आली.
दरम्यान शीना बोरा हत्याकांडात सीबीआयच्या तपासानुसार, पीटर मुखर्जी आणि त्यांची पत्नी इंद्राणी मुखर्जी यांना 19 नोव्हेंबर 2015 रोजी या खटल्यात अटक करण्यात आली होती. इंद्राणी मुखर्जी या यातील मुख्य आरोपी आहेत. तर मुंबई उच्च न्यायालयाने, पीटर मुखर्जी याला नुकताच जामीन मंजूर केला आहे. सीबीआयच्या (CBI) विनंतीनुसार मुंबई उच्च न्यायालयाने 6 आठवड्यांसाठी या आदेशाला स्थगिती दिली आहे, जेणेकरून सीबीआय सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकणार आहे.
दुसरीकडे राकेश यांनी आपला पुस्तकात 26/ 11च्या हल्ल्यातील दहशतवादी कसाब बाबत सुद्धा काही महत्वाचे खुलासे केले आहेत,कसाबच्या अटकेनंतर पाकिस्तानची दहशतवादी संघटना आयएसआय कडून हा हल्ला हिंदू दहशतवाद रूपात दाखवण्याचा प्रयत्न केला जात होता, यासाठी त्यांनी कसाब जवळ काही खोटी ओळखपत्र सुद्धा दिली होती, यापैकी एकात कसाबचे नाव हे समीर चौधरी असे देण्यात आले होते. कसाब ला मारण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या गॅंगला सुपारी सुद्धा देण्यात आल्याचे मारिया यांनी म्हंटले आहे.