Drunken Driving (Photo Credits: Pixabay)

Mumbai Drunk Driving Cases: गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबईत ड्रंक ड्राइव्हच्या (Drunk Drive) घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पोलीस यावर आळा घालण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र त्याला अजूनही अपेक्षित यश नसल्याचे दिसत आहे. मद्यपान करून वाहन चालवण्याच्या घटनांच्या वाढत्या संख्येला प्रतिसाद म्हणून, मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांवर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवण्यासाठी विविध रस्ते आणि जंक्शनवर नाकाबंदीची वारंवारता वाढवली आहे.

गेल्या वर्षी जानेवारी ते जुलै दरम्यान केवळ 447 जणांवर मद्यपान करून वाहन चालवल्याबद्दल दंड आकारण्यात आला होता. मात्र, यावर्षी याच कालावधीत ही संख्या 4,196 वर पोहोचली आहे.

एमटीपीच्या आकडेवारीनुसार, मद्यपान करून वाहन चालवण्याच्या घटनांसाठी शहरातील हॉटस्पॉट्समध्ये सहार, साकीनाका, डीएन नगर, सांताक्रूझ, नागपाडा, ट्रॉम्बे (मानखुर्दजवळ), ओशिवरा, मुलुंड, एमआयडीसी (अंधेरी), वाकोला, दहिसर आणि घाटकोपर यांचा समावेश आहे. या भागात बार आणि रेस्टॉरंट्सचे प्रमाण जास्त आहे, ज्यामुळे दारू पिऊन वाहन चालवण्याचे प्रमाण वाढले आहे.

याउलट, आकडेवारी दर्शवते की मद्यपान करून वाहन चालविण्याचे प्रमाण सर्वात कमी असलेल्या ठिकाणांमध्ये मरीन ड्राइव्ह, पायधोनी, कांजूरमार्ग, धारावी, पवई, वडाळा, माहीम, माटुंगा आणि कुलाबा यांचा समावेश आहे. या भागात मद्यपान करून वाहन चालवण्याचे प्रमाण कमी असण्याचे कारण स्पष्ट करताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘या भागात लोक दारूचे सेवन करत नाही असे नाही, तर मद्यपान करून वाहन चालवण्याऐवजी घरी परत येण्यासाठी ऑटो,  कॅबसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. कुलाबा सारख्या भागात, अनेक लोकांनी आपल्या वाहनांवर ड्रायव्हर नियुक्त केले आहेत.’ (हेही वाचा: Cyber Crime: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! सायबर घोटाळेबाजांकडून वसूल केली 100 कोटी रुपयांची फसवणूक केलेली रक्कम; 35,918 तक्रारींचे केले निवारण)

ड्रंक ड्राइव्हची एकूण प्रकरणे-

1 जानेवारी ते 6 जुलै 2023: 447

1 जानेवारी ते 6 जुलै 2024: 4,196

दरम्यान, अलीकडच्या काळात मद्यप्राशन करून वाहन चालविण्याच्या घटनांमुळे जीवघेणे अपघात घडतात, ज्याने वाहतूक पोलिसांना अधिक सतर्क राहण्यास प्रवृत्त केले आहे. उल्लेखनीय घटनांमध्ये पुणे पोर्श प्रकरण, वरळीतील हिट अँड रन प्रकरण समाविष्ट आहे.