Mumbai: मुंबईतील जेडब्लू मॅरियट हॉटेलच्या परिसरातील एका कुत्र्यावरुन गाडी चालवणाऱ्या एका चालकाला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. तर पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल पशुप्रेमींनी कौतुक केले आहे. जुहू पोलिसांनी असे म्हटले की, रामानंद गौड (43) असे आरोपीचे नाव असून तो भारत गॅसमध्ये काम करतो. तर रामानंद याने भरधाव वेगाने गाडी चालवत ती कुत्र्यावरुन नेली. गौड याला त्याच्या घरातून अटक करण्यात आली आणि तातडीने त्याला जुहू पोलीस स्थानकात आणण्यात आले. तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला.
पशु कार्यकर्ते डॉ. नंदिनी कुलकर्णी यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना असे म्हटले की, मी बुधवारी 10 वर्षीय एका कुत्र्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. तर 24 तासातच जुहू पोलिसांकडून आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. त्यामुळे जुहू वरिष्ठ पोलीस अधिकारी सुधाकर शिरसाट, इंन्स्पेक्टर प्रकाश घारगे आणि तपास करणारे अधिकारी सब-इंन्स्पेक्टर शिल्पा देवकर यांचे नंदिनी यांनी आभार मानले.(पुण्यात 'तोकडे कपडे' घातल्यावरून भाडेकरू म्हणून राहणार्या 2 मुलींना मारहाण; एकाच कुटुंबातील 6 जण पोलिसांच्या ताब्यात)
जुहू येथील पार्किंगच्या येथे भरधाव वेगाने आरोपी गाडी चालवत होता. त्याचवेळी डाव्या बाजूला एक कुत्रा झोपला होता. तेव्हा आरोपीने त्याच्या पोटावरुन गाडी नेली. या प्रकारामुळे घटनास्थळी खुप गर्दी झाली आणि त्याचवेळी प्राण्यांसाठीची रुग्णवाहिका तेथून गेली. तेव्हा कळले की, एका मोठ्या गाडीने कुत्र्याला धडक दिली आहे. पुन्हा ज्यावेळी घटनास्थळी भेट दिली असता स्थानिकांनी सांगितले की, भारत गॅस कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने हे कृत्य केले आहे असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
एफआयआर दाखल केल्यानंतर जुहू पोलीस अधिकाऱ्यांनी काही सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यात असे दिसून आले की, भारत गॅस कंपनीची गाडी ज्या दिवशी घटना घडली तेव्हा होती. याबद्दल पशु प्रेमींनी सुद्धा पोलिसांना हेच सांगितले होते. तेव्हा पोलिसांनी भारत गॅस कंपनीला आदेश देत आरोपी चालक ड्युटीवर होता का याबद्दल तपास करण्यास सांगितले. अशाप्रकारे आरोपीला अटक करण्यात आली. तर एखादा प्राणी तुमच्या गाडी समोर आल्यास तेव्हा वाहनाचा वेग कमी करावा जेणेकरुन अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत असे डॉ. कुलकर्णी यांनी म्हटले. दरम्यान, गौड याच्या विरोधात आयपीसी कलम 429,279 आणि कलम 11(1) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.