देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 6 हजारांच्या पार गेला आहे. त्यात म्हणजे मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईतील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत तर कोरोनाबाधितांचा आकडा 200 च्या पार गेला आहे. धारावी परिसर हा दाटीवाटीचा असून येथे सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करणे अशक्य आहे. मात्र तरीही या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर योग्य ती काळजी घेतली जात आहे. खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांच्या पुढाकाराने आणि खासगी डॉक्टरांच्या सहाय्याने धारावीत 350 खासगी दवाखाने येत्या 27 एप्रिल पासून सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 241 वर पोहोचली आहे. तर कोरोनाबळींची संख्या 14 वर पोहोचली आहे. प्रशासनाकडून यापूर्वीच धारावी परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. मुस्लिम नगर आणि मुकूंदनगरमध्ये आतापर्यंत कोरोनाच सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत डॉक्टरांच्या पथकांकडून धारावीतील हजारो लोकांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. यामध्ये कोरोनाचा संभाव्य धोका असलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर आता खासगी दवाखाने सुरु करण्यात येणार असल्याचा महत्वूपूर्ण निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे.(Coronavirus In Maharashtra: लॉकडाउनमुळे कोरोनाचा वेग संथ ठेवण्यास सरकारला यश ते नागरिकांचे आशिर्वाद हेच बळ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला जनतेशी संवाद, पहा महत्वाचे मुद्दे)
#मुंबईतील #कोरोनाचा मुख्य केंद्र ठरलेल्या #धारावीसाठी खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने आणि खासगी डॉक्टरांच्या सहाय्याने धारावीतील ३५० खासगी #दवाखाने सोमवार, दिनांक २७ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय #महानगरपालिकेने घेतला आहे. #PIBFactCheck #prasarbharti #arogysetu pic.twitter.com/hXoAnPTYDS
— AIR News Mumbai, घरीच रहा, सुरक्षित रहा (@airnews_mumbai) April 26, 2020
दरम्यान, धारावी परिसर अधिक मोठा असल्याने प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. येथील लोक घराबाहेर पडू नये, म्हणून या परिसरातील नागरिकांना दररोज सकाळी आणि रात्री प्रत्येकी जेवणाच्या पाकिटांचे वितरण, विविध धान्य आणि आवश्यक वस्तूंचा समावेश असलेल्या पाकिटांचे वाटप तसेच गरजवंतांना औषधांचाही पुरवठा करण्यात येत आहे. एकूणच राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता नागरिकांनी लॉकडाउनच्या नियमाचे पालन करणे अत्यावश्यक आहे. त्याचसोबत राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून 3 मे नंतर लॉकडाउनच्या आदेशाबाबत पुढील निर्णय जाहीर केला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.