लॉकडाऊन काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाल्यावर झालेली जवळीक एका इसमास तब्बल 11 लाख रुपयांना पडली आहे. पवई पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची वाच्यता झाली. प्राप्त माहितीनुसार, 29 वर्षीय पीडित व्यक्ती ही मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये काम करते. या व्यक्तीची सोशल मीडियाद्वारे एका विदेशी महिलेसोबत ओळख झाली. ही महिला युनायटेड किंग्डमची (UK) येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
पंचतारांकीत हॉलेटलमध्ये काम करणारा इसम आणि सदर महिला यांच्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याला महिलेकडून इसमास फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट मिळाली. या ओळखीतून संवाद, आणि जवळीक वाढली. दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले आणि व्हॉट्सअॅप कॉलिंग द्वारे थेट बोलायला सुरुवात केली. या महिलेने या व्यक्तीला सांगितले की मला भारतात व्यवसाय करायचा आहे. त्यासाठी काही आर्थिक मदतीची गरज आहे. या व्यक्तीनेही कोणतीहगी शहानिशा न करता तिला आर्थिक मदत देण्याचे कबूल केले. (हेही वाचा, Nana Patole on PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठकीत भांडण, भाजपला थेट सोडचिठ्ठी; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितला किस्सा)
दरम्यान, एके दिवशी या महिलेने सांगितले की, तिला मत्स्य व्यवसायासाठी शेत विकत घेण्याची इच्छा आहे. यावर या इसमाने तिला प्रत्यक्ष भारतात येण्याचा आणि नंतर निर्णय घेण्याचा सल्ला दिला. “काही दिवसांनंतर तिने या इसमाचा रहिवासी पत्ता विचारला आणि त्याला सांगितले की हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तिने मला एक मौल्यवान भेट तसेच 50,000 पाऊंड (भारतीय रुपयांमध्ये 50 लाख रुपये) एअर कार्गोमार्फत पाठविले आहेत.
पुढे या महिलेने असेही सांगितले की, हे 50,000 पाऊंड मिळविण्यासाठी परकीय चलन स्वीकारण्याच्या शुल्कापोटी काही रक्कम भरावी लागेल. ही रक्कम 11 लाख रुपये इतकी आहे. या महिलेने या इसमाचा ईमेल आयडी विचारुन त्यावर काही कागदपत्रेही पाठवली. आपल्याला रक्कम मिळेल या आशेने या इसमाने संबंधित महिलेसाठी 11 लाख जमा केले. त्यासाठी लॉकडाऊन असतानाही त्याने कर्ज काढून रक्कम जमा केली. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे ध्यानात येताच त्याने पवई पोलिसांमध्ये तक्रार दिली. महाराष्ट्र सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.