Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबईतील (Mumbai) एका 34 वर्षीय महिलेची 41.5 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी किराणा दुकानांची चेन आणि मुंबईतील प्रमुख व्यवसाय असलेल्या नूतन दाल मिलच्या मालकाला गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. 15 टक्के परतावा देण्याचे आश्वासन देऊन त्याने अनेक ग्राहकांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले. अनिता रूपसिंग कडेचा यांनी गेल्या महिन्यात पोलिसांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. इव्हेंट डेकोरेटर असलेल्या कडेचा यांनी सांगितले की, त्या आरोपी केतन रांभिया याला त्यांच्या मित्रामार्फत भेटल्या होत्या.

या मित्रानेदेखील केतनकडे पैसे गुंतवले होते. जून 2019 ते डिसेंबर 2020 दरम्यान, कडेचा यांनी केतनकडे एकूण 41.5 लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र जेव्हा त्यांनी परतावा मागितला तेव्हा, रांभियाने त्यांना 16 टक्के परताव्यात आणखी एक वर्ष पैसे आपल्याकडेच ठेवण्यास सांगितले. पुढे तो कालावधी संपल्यानंतरही रांभिया पैसे परत करू शकला नाही. याबाबत थोडा संशय आल्यानंतर कडेचा यांनी त्यांच्या गुंतवणुकीचे कोर्ट स्टॅम्प पेपर तपासले. त्यावेळी बहुतेक कागदपत्रांवर एकच अनुक्रमांक असल्याचे आढळले.

त्यानंतर त्यांनी वकिलाशी सल्लामसलत केली व पोलिसांकडे धाव घेतली. कडेचा यांनी सांगितले की, आरोपी गेली अनेक वर्षे त्याचे ग्राहक असलेल्या लोकांची फसवणूक करत आहे. तो लोकांना 15 ते 16 टक्के वार्षिक नफा देण्याचे आश्वासन देऊन गुंतवणूक करण्यास भाग पाडतो व नंतर परतावा परत देत नाही. आतापर्यंत जवळजवळ 100 हून अधिक लोक त्याच्या फसवणुकीला बळी पडले असावेत आणि या  फसवणूकीची रक्कम 40 कोटींच्या पुढे जाऊ शकते. (हेही वाचा: Latur Crime: केवळ 500 रुपयांच्या वादातून तरुणाची आईसमोर हत्या, 8 जणांना जन्मठेपेची शिक्षा; लातूर येथील घटना)

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘मूळ स्टॅम्प पेपर्सवर वॉटरमार्क आहेत पण आरोपीने स्वाक्षरी केलेल्या बाँडवर वॉटरमार्क दिसत नाही. त्याने बहुधा ते कुठूनतरी फोटोकॉपी किंवा छापले असावेत. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी राम्भियावर आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आणि बुधवारी रात्री त्याला अटक केली. त्याला कोर्टात हजर केले असता 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.