Mumbai Coastal Road (संग्रहित संपादित प्रतिमा)

मान्सूनच्या आगमनासोबतच मुंबईकरांसाठी अजून एक दिलासा देणारी बाब समोर आली आहे. मुंबई कोस्टल रोडच्या (Mumbai Coastal Road) दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन सोमवारी होणार असून, त्यानंतर मरिन ड्राइव्ह ते हाजी अलीपर्यंतचा उत्तरेकडील कॅरेजवे 11 जूनपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी लिंक (BWSL) जोडण्याचे काम ऑक्टोबर 2024 पर्यंत पूर्ण होईल.

वरळी ते मरीन ड्राइव्ह दरम्यानच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचा दक्षिणेकडील कॅरेजवे 12 मार्च रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र 31 मे रोजी होणाऱ्या रस्त्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनास उशीर झाला. यामुळे नागरिकांसह विरोधी पक्षांनीही टीका केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10 जून रोजी उत्तरेकडील कॅरेजवे सुरु करण्याची घोषणा केली.

महापालिका आयुक्त भूषण गगराणी म्हणाले, ‘कोस्टलरोडच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ सोमवारी होणार असून, मंगळवारीपासून सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला असेल. वरळी सी लिंकशी कोस्टल रोड जोडण्याचे काम अद्याप सुरू असल्याने, सध्या हा रस्ता 16 तास खुला राहणार आहे. मरीन ड्राईव्ह येथील प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे-वरळी सी लिंकपर्यंतचा 10.58 किमीचा कोस्टल रोड बीएमसी तयार करत आहे. या रस्त्याने प्रवासाचा वेळ 70 टक्के आणि इंधनाचा वापर 34 टक्क्यांनी कमी करून, दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरांमधली वाहतूक सुलभ करणे हा या रस्त्याचा उद्देश आहे. (हेही वाचा: Mumbai: 'पालिकेचे कर्मचारी निवडणूक कामातून कार्यमुक्त, पावसाळी कामांवर परिणाम होणार नाही'; वृत्तपत्रांमधील बातम्यांवर प्रशासनाचे स्पष्टीकरण)

यामध्ये 4+4 लेन, स्टिल्टवरील पूल, एक उन्नत रस्ता आणि जुळे बोगदे यांचा समावेश आहे. अमरसन्स गार्डन, हाजी अली आणि वरळी सीफेस येथे इंटरचेंज आहेत. बीएमसी या प्रकल्पावर 13,984 कोटी रुपये खर्च करत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोस्टल रोडच्या बोगद्यात गळती लागली असल्याची बातमी आली होती. बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर त्यावर बीएमसीने उपाययोजना केल्या. मुंबई किनारी रस्ता प्रकल्प अंतर्गत, भूमिगत दक्षिणवाहिनी बोगद्याच्या दोन सांध्यांमधून झिरपणारे पाणी रोखण्यात आले, तर तीन सांध्यांच्या ठिकाणी असणारा ओलावा आटोक्यात आणला गेला.