Mumbai Coastal Road (संग्रहित संपादित प्रतिमा)

वरळी ते मरीन ड्राइव्ह या बहुप्रतीक्षित कोस्टल रोडच्या (Worli-Marine Drive Coastal Road) एका भागाचे उद्घाटन शनिवार, 9 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता होणे अपेक्षित आहे. बीएमसी या रस्त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाची तयारी करत आहे. माध्यमांमध्ये समोर आलेल्या अहवालांनुसार हे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. सीएम एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी कोस्टल रोड प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर या रोडचे उद्घाटन 9 मार्च ला होणार असल्याचे अहवाल समोर येत आहेत. या महिन्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची अंमलबजावणी होत असल्याने, उद्घाटन कार्यक्रम त्याआधी आयोजित करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

सुरुवातीला उद्घाटन फेब्रुवारीत होणार होते, तथापि, लॉजिस्टिक कारणांमुळे ते होऊ शकले नाही. आता 9 मार्च नंतर आठवड्याच्या दिवशी सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत ही लेन चालवणे अपेक्षित आहे. उर्वरित वेळ उत्तरेकडील भाग पूर्ण करण्यासाठी आणि वरळी-वांद्रे आणि शिवरी सागरी पुलांना जोडण्यासाठी समर्पित असेल. याआधी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 8 दिवसांत कोस्टल रोड अंशत: खुला केला जाईल, अशी घोषणा केली होती. सागरी जोड प्रकल्पाला किफायतशीर पर्याय म्हणून कोस्टल रोड प्रकल्पाची संकल्पना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 2011 मध्ये मांडली होती. नंतर भाजप-शिवसेना सरकारच्या काळात या उपक्रमाला गती मिळाली. (हेही वाचा: Pune Airport Terminal : पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला; 'या' तारखेला पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार ऑनलाईन उद्घाटन)

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सागरी किनारा रस्त्यासह वरळी, दादर परिसरातील सिमेंट रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मुंबई सागरी रस्ता म्हणजेच मुंबई कोस्टल रोडच्या परिसरात 320 एकर जागतिक दर्जाचे पार्क उभे केले जाईल, असे सांगितले. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तयार होत असलेल्या या कोस्टल रोडचे काम वेगाने पूर्ण होत आहे. या कोस्टल रोडच्या परिसरात 200 एकर जागेत वेगवेगळी झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच लवकरच हा कोस्टल रोड नागरिकांच्या सेवेत दाखल होईल, असे मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.

दरम्यान, कोस्टल रोड प्रकल्प हा मुंबई ते कांदिवली दरम्यान सुमारे 29 किमीचा आहे. मुंबई कोस्टल रोड प्रकल्प दोन भागात विभागला गेला आहे. त्याचे दक्षिण भाग आणि उत्तर भाग असे दोन भाग आहेत. यामध्ये दक्षिणेकडील भागाचे काम प्रथम हाती घेण्यात आले आहे. साउथ कोस्टल प्रोजेक्ट हा साडेदहा किलोमीटरचा पट्टा आहे. आता वरळीला मरिन ड्राइव्हशी जोडणारा, बहुप्रतीक्षित कोस्टल रोड प्रकल्पाचा पहिला टप्पा लवकरच खुला होणार आहे.