मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ: शिवडी ते कुलाबा चे उमेदवार, महत्त्वाच्या लढती आणि निकाल घ्या जाणून
Mumbai | File Image

मुंबईसह महाराष्ट्रामध्ये (Maharashtra Assembly Elections) येत्या 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक 2019 साठी मतदान होणार आहे. या मतदानानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेवर कुणाची सत्ता येणार? आणि मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याची सार्‍यांनाच उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या भाजपाच्या देवेंद्र फडणवीस (Devendra  यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार चालवले जात आहे. भाजपाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणूक निकालामध्ये भारतीय जनता पक्षाला (BJP) सर्वाधिक 122 जागा,शिवसेनेस 63, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 42 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या होत्या.यंदा यासोबतच मनसे, वंचित आघाडी, एमआयएम यासारखे पक्ष देखील निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे. मग पहा देशाची आर्‍थिक राजधानी आणि महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई शहरावर कोण कब्जा मिळवंतय? मुंबई शहरातील उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेल्या शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या विधानसभा मतदारसंघात पहा कोण आहे उमेदवार आणि कशी रंगणार लढत?

मुंबई शहर विधानसभा मतदारसंघ आणि प्रमुख लढती

शिवडी विधानसभा मतदारसंघ

प्रामुख्याने मराठी भाषिक आणि कोळी बांधवांचा शिवडी विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये सध्या शिवसेनेचे अजय चौधरी आमदार आहेत. त्यांच्या विरूद्ध यंदा कॉंग्रेसचे उदय विठ्ठल फणसेकर आणि मनसेचे संतोष नलावडे यांच्यामध्ये मुकाबला रंगणार आहे.

भायखळा विधानसभा मतदारसंघ

दक्षिण मुंबईमधील भायखळा विधानसभा मतदार संघामध्ये अनेक वर्ष कॉंग्रेस पक्षाचं वर्चस्व होतं मात्र 2014 साली एमआयएमच्या वारीस पठाण यांनी विजय मिळवला आहे. यंदाही त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या विरूद्ध शिवसेनेच्या यामिनी जाधव आणि कॉंग्रेसचे मधुकर चव्हाण निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

मलबार हिल विधानसभा मतदारसंघ

मुंबई शहरातील दक्षिण भागातील आणि उच्चभ्रू, अति उच्चभ्रु मतदारांचा विधानसभा मतदारसंघ म्हणून या विधानसभा मतदार संघाची ओळख आहे. या मतदार संघामध्ये 1995 पासून भाजपाचे मंगलप्रभात लोढा यांचं वर्चस्व आहे. त्यांनी आमदारकीची डबल हॅट्रिक केली आहे. यंदाही भाजपाने त्यांना तिकीट जाहीर केले आहे. भाजपाचे मंगलप्रभात लोढा विरूद्ध हिरा नवाजी देवदासी अशी येथे लढत होणार आहे.

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ

मुंबई शहराचं नाव ज्या देवीच्या नावावरून पडलं त्या मुंबादेवीचं मंदिर या भागात आहे. मुंबादेवी परिसरात लहान मोठे उद्योग असल्याने उद्योजक आणि मुस्लीम मतदारांचा अधिक प्रभाव आहे. सध्या या मतदारसंघातून कॉंग्रेसचे अमिन पटेल विद्यमान आमदार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणूकीसाठीदेखील त्यांना तिकीट जाहीर करण्यात आलं आहे.

कुलाबा विधानसभा मतदारसंघ

कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणार्‍या कुलाबा मतदारसंघामध्ये राज पुरोहित यांचा दाबदबा होता. राज पुरोहित 5 वेळा आमदार झाले आहेत. यंदा  राज पुरोहित यांचा पत्ता कट करून कॉंग्रेसने अशोक जगतापने  तर भाजपाने राहुल नार्वेकरला निवडणूकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

सध्या अस्तित्त्वात असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपणार आहे. 21 सप्टेंबरला निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करत निवडणूकीची तारिख जाहीर केली आहे. 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर 24 ऑक्टोबरला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.