देशात महाराष्ट्रात कोरोना व्हायरस महामारीचा सर्वात संसर्ग आढळून आला आहे. अशात कोरोना व्हायरस रुग्णांच्या आकडेवारीत फेरफार झाल्याचे वृत्त आहे. गुरुवारी राजधानी मुंबईतील बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी अँड ट्रान्सपोर्ट (BEST) युनियनने दावा केला आहे की, कोरोनामुळे 107 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. बेस्टद्वारे सांगण्यात आलेल्या 9 कर्मचा-यांच्या मृत्यूची संख्या ही चुकीची असल्याचा दावा त्यांनी केला आहे. बेस्टच्या अधिकृत आकडेवारीनुसार आतापर्यंत 1385 कामगारांना संसर्ग झाला असून, त्यापैकी 1078 लोक म्हणजेच 78 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. मृतांची संख्या 9 आहे, जी मेच्या दुसर्या आठवड्यापासून अद्ययावत झालेली नाही.
मुंबई मिररच्या क्रुत्तानुसार, बेस्ट यूनियनच्या एका सदस्याने आपले नाव प्रकाशित करायचे नाही, या शर्तीवर सांगितले की, 'बेस्ट प्रशासन मृत्यूची संख्या जाहीर करत नाही. कोरोना संक्रमित झालेल्या किमान 107 कामगारांचा मृत्यू झाला आहे परंतु प्रशासन ते नाकारत आहे.' या अहवालानुसार बेस्टच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जे कर्मचारी इस्पितळात दाखल होण्यापूर्वी किंवा मृत्यूपूर्वी 15 दिवसांपर्यंत कामावर होते, फक्त त्यांचाच या आकड्यांमध्ये समावेश केला जात आहे. म्हणजेच ऑन ड्युटी असताना कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांचीच आकडेवारी बेस्ट प्रकाशित करत आहे.
बेस्टच्या आकडेवारीत समाविष्ट करण्याच्या इतर अटींमध्ये, मृत्यू प्रमाणपत्रामध्ये कोविडचा उल्लेख असणे गरजेचे आहे. कर्मचार्याने आजारी असताना आम्हाला कळवावे किंवा रुग्णालयात भरती झाल्यावर सांगावे आणि कुटुंबाने आयसीएमआर (ICMR) मंजूर कोविड-19 चा अहवाल आमच्याकडे सादर करावा. अहवालानुसार या सर्व अटींचे पालन करून 9 नव्हे तर 25 जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, अशी बरीच प्रकरणे आहेत ज्यात सुट्टीच्या दिवसात कर्मचाऱ्याला कोविडचा संसर्ग झाला व त्याचा मृत्यू झाला. आपण अशा कामगारांना फ्रंट लाइन कामगार कसे मानू?’ (हेही वाचा: महाराष्ट्रामधील लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवला; मुंबई, पुणे आणि इतर शहरांमध्ये मॉल व मार्केट कॉम्प्लेक्स उघडण्यास परवानगी, जाणून घ्या काय असेल सुरु)
बेस्टच्या अधिकाऱ्यांनी असेही म्हटले आहे की, ‘संस्था सर्व, 36,000 कर्मचाऱ्यांची चौकशी करत आहे- कोण सुट्टीवर आहे, कोणाची तब्येत ठीक नाही हे पहिले जात आहे. युनियनने 107 मृत्यू झाल्याचा पुरावा द्यावा त्यानंतर आम्ही त्यांच्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी नक्कीच करू.’