Maharashtra Police | (File Photo)

मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता विळखा आता सामान्यांसोबतच मुंबई पोलिस दलाच्या अधिकार्‍यांसाठीदेखील जीवघेणा ठरत आहे. मंगळवार, 12 मे च्या रात्री मुंबई शहरात शिवडी पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर शंकर वाघमारे या कोव्हिड योद्धाची कोरोना व्हायरस विरूद्धची झुंज अयशस्वी ठरली. दरम्यान त्यांच्या निधनाच्या वृत्ताने मुंबई सह महाराष्ट्र पोलिस दलानेही आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल व महाराष्ट्र पोलीस दलाच्या अधिकार्‍यांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान काल रात्री उशिरा ट्वीटरच्या माध्यमातून वाघमारे यांच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे मुंबईमध्ये मागील काही दिवसांत 5 तर महाराष्ट्र राज्यात 8 पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या 50-55 वर्षातील पोलिसांना बंदोबस्तासाठी न बोलवण्याचा निर्णय पोलिस खात्याकडून घेण्यात आला आहे. भविष्यात राज्यात बंदोबस्तासाठी अधिक मनुष्यबळाची गरज लागल्यास केंद्राकडून मदत घेण्याचा मानस देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला आहे.

महाराष्ट्र पोलिस ट्वीट

मुंबईमध्ये आर्थर रोड जेल, भायखळा तुरुंगामध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याने आता पोलिसांवरील ताण वाढला आहे. जेल मधील काही कैद्यांना सोडण्याचा तसेच राज्यातील आठ जेल मध्ये लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सध्या राज्यात 450 पेक्षा अधिक पोलिस कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर राज्यात विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.