मुंबई: असल्फा मेट्रो स्टेशन जवळ घराची भिंत कोसळली; 3 जणांची सुरक्षित सुटका
Wall of House Collapses in Asalpha (Photo Credits-ANI)

मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा दमदारपणे कोसळायला सुरूवात झाली आहे. मागील काही तासांपासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई भागात कोसळणार्‍या पावसामुळे समान्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. यामध्येच आता अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. 8 सप्टेंबरच्या मध्यरात्री मुंबईतील असल्फा मेट्रो स्टेशन (Asalpha Metro Station)  जवळील एका घराची भिंत कोसळली आहे. घराचा स्लॅब कोसळल्याने त्यामध्ये 3 जण अडकल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरा हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. मात्र घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या 3 टीम्स तात्काळ रवाना करण्यात आल्या आहेत. सध्या बचावकार्य सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार मागील काही दिवस मुंबईमध्ये बरसणार्‍या मुसळधार पावसामुळे या भागातील अनेक चाळींच्या घरातील भिंती हलल्या होत्या. काल रात्री अचानक पावसाची सर आणि वारा आल्याने एक भाग कोसळला. त्यामुळे मातीच्या ढिगार्‍यात काही जण अडकल्याची शक्यता आहे. घराचा जो भाग कोसळला आहे त्याच्याखाली दुकानदेखील होते. त्यामुळे दुकानात काही जण होते का? हे देखील पाहून बचावकार्य सुरू आहे.

ANI Tweet

भिंत कोसळल्यानंतर त्यामध्ये काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर अडकलेल्यांना वाचवण्यासाठी मदत कार्य वेगाने सुरू ठेवण्याचे काम प्रशासन आणि अग्निशमन अधिकारी करत आहेत.