Water supply | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

दक्षिण मुंबईमध्ये महानगर नगरपालिकेच्या D आणि E विभागांमध्ये जल वाहिन्याच्या दुरूस्तीच्या कामासाठी 10 आणि 11 ऑक्टोबर दिवशी पाणी कपातीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. रेसकोर्स, हाजीअली या भागामध्ये 1600 मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीमधून पाणी गळती होत असल्याची बाब प्रशासनाच्या ध्यानात आली आहे. पाणी गळतीच्या माध्यमातून होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी त्याच्या दुरूस्तीचं काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस गैरसोय टाळण्यासाठी पाणी साठा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईतील कोणत्या भागात होणार पाणी कपात?

बीएमसीच्या डी विभागामध्ये तुकाराम जावजी मार्ग, ताडदेव मार्ग, साने गुरुजी मार्ग, तुळशीवाडी, आंबेडकर नगर, मुंबई सेंट्रल आणि महालक्ष्मी रेल्वे स्टेशन, स्लेटर रोड, ताडदेवचा आसपास भाग, गमदिया कॉलनी या भागांमध्ये तर 'ई' विभागात नायर रुग्णालय आणि कस्तुरबा गांधी रुग्णालय परिसरात 10 आणि 11 ऑक्टोबर हे दोन पाणी कपात केली जाणार आहे. 10 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम सुरू केले जाईल. तर शुक्रवार 11 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वाजेपर्यंत हे काम सुरू राहणार आहे.

सुमारे साडे अठरा तास जल वाहिनीच्या दुरूस्तीचं काम सुरु राहणार असल्याने नागरिकांना गैरसोय टाळण्यासाठी पुरेसे पाणी भरून ठेवावे आणि त्यानुसार पाण्याच्या वापरचे नियोजन करावे असे आवाहन नागरिकांना पालिका प्रशासनाने केले आहे.