Medical students stage a demonstration against the attacks on doctors in Kolkata (Photo Credits: IANS)

काही महिन्यांपूर्वी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याबाबत कायदा करण्याची मागणीही केली गेली होती, मात्र आता मुंबई (Mumbai) येथे बीएमसीच्या नायर रुग्णालयात (Nair Hospital) डॉक्टरांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. रूग्णाच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या 2 डॉक्टरांवर जीवघेणा हल्ला केला आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली आहे. या हल्ल्यानंतर नायर रुग्णालयाचे डॉक्टर संपावर गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त कुटुंबीयांनी डॉक्टरांवर हल्ला केला. याबाबत आगरपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी डॉक्टर सतत दबाव आणत आहेत.

नायर इस्पितळातील रहिवासी डॉ. कल्याणी डिंगरे यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी एका 13 वर्षाच्या मुलाला डोकेदुखीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज मुलाची अस्वस्थता वाढल्याने डॉक्टरांनी मुलाला व्हेंटिलेटरवर ठेवण्याचा सल्ला दिला होता. मात्र रुग्णाच्या कुटूंबाने व्हेंटिलेटरवर ठेवण्यास नकार दिला. या गोष्टीनंतर 1 तासात मुलाचा मृत्यू झाला. मृत्यू नंतर, मुलाच्या कुटुंबातील चिडलेल्या सदस्यांनी 2 निवासी डॉक्टरांवर हल्ला केला, डॉक्टर या हल्ल्यात जखमी झाले.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याच वेळी, डॉक्टरांनी हल्ल्याचा निषेध करत रुग्णालयाची ओपीडी बंद केली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनांनी (Maharashtra Association of Resident Doctors) नायर रुग्णालयात डॉक्टरांवर झालेल्या कथित हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच रुग्णालयाच्या प्रत्येक प्रभागात पुरेशी सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. आता घडलेल्या गोष्टीचे गांभीर्य पाहता, आमच्या मागण्या मान्य झाल्यावरच काम सुरू केले जाईल, असे डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.