MTHL Inauguration: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक पुल' उद्घाटनासोबतच Orange Gate आणि Thane-Borivali Tunnel ची पायाभरणी
Mumbai Trans Harbour Link Bridge (PC- Twitter/ @NM_Infra)

MTHL Inauguration: मुंबई ते नवी मुंबईला जोडणारा बहुप्रतिक्षित मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक (MTHL) पूल जानेवारी महिन्यात सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. एमटीएचएल पुलाचे उद्घाटन 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते होणार आहे. त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे उद्घाटन 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची पुष्टी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी केली.

एमटीएचएल ब्रिज हा देशातील सर्वात लांब सागरी सेतू आहे. याशिवाय 'ओपन रोड टोलिंग' (ORT) प्रणालीच्या सुविधेने सुसज्ज असलेला हा देशातील पहिला पूल आहे. यासोबतच खुल्या टोल पद्धतीमुळे टोल भरण्यासाठी पुलावर वाहने थांबवण्याची गरज भासणार नाही. अहवालानुसार, 18 हजार कोटी रुपये खर्चून बांधलेला सहा लेनचा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ब्रिज 22.8 किमी लांबीचा आहे, त्यातील 16 किलोमीटर समुद्रात आहे. त्यामुळे वाहतूक सुरू झाल्यानंतर मध्य मुंबईतील शिवडी ते नवी मुंबईतील चिर्ले हे अंतर 15 ते 20 मिनिटांत कापले जाणार आहे.

एमटीएचएल प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. एमटीएचएल सुरू झाल्यानंतर मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवासही सोपा होणार असून त्यासाठी वेळही कमी लागणार आहे. यामुळे लोणावळा, खंडाळा आणि मुंबईदरम्यानचा प्रवास ९० मिनिटांनी कमी होण्याची शक्यता आहे. दिवंगत पंतप्रधानांच्या स्मरणार्थ त्याचे अधिकृत नाव 'अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावा शेवा अटल सेतू' ठेवण्यात आल्याची माहिती आहे. एमटीइहएल मुळे केवळ शहरातील वाहतुकीलाच गती मिळणार नाही, तर नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासालाही गती मिळेल. (हेही वाचा: National Youth Festival 2024: नाशिक येथे 12 ते 16 जानेवारी दरम्यान होणार राष्ट्रीय युवा महोत्सव; PM Narendra Modi करणार उद्घाटन)

अहवालानुसार, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण मुंबई आणि ठाण्यातील दोन भूमिगत रस्ते प्रकल्पांची पायाभरणी करतील, तसेच उरणपर्यंतच्या चौथ्या उपनगरीय मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याला हिरवा झेंडा दाखवतील. 12 जानेवारी रोजीच पंतप्रधान ऐरोली-कळवा मार्गावरील दिघा स्थानकाचे उद्घाटन करतील अशी अपेक्षा आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA), ज्यांनी एमटीएचएल बांधले आहे, ते ऑरेंज गेट-मरिन ड्राइव्ह बोगदा आणि ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा देखील बांधत आहे. हा पूर्व-पश्चिम ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह प्रकल्प क्रॉफर्ड मार्केट, जीपीओ आणि सीएसएमटी येथील जंक्शन्स यांसारख्या भागांची गर्दी कमी करण्यासाठी कार्यान्वित केला जात आहे. हा बोगदा रस्ता मरीन ड्राइव्हकडे जाणार्‍या आणि येणाऱ्या वाहतुकीसाठी बायपाससारखा असेल. ठाणे-बोरीवली बोगदा हा गेम चेंजर ठरेल अशी अपेक्षा आहे. साधारण 14,400 कोटी रुपयांच्या बोरीवली बोगदा प्रकल्पामुळे ठाणे ते बोरीवली दरम्यानचा प्रवास 90 मिनिटांवरून 15-20 मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.