MPSC Hacking: एमपीएससी हॉल तिकीट लिक प्रकरणी एकास अटक, आरोपी डॉर्कनेटवरील हॅकर्सच्या संपर्कात असल्याचा संशय; नवी मुंबई पोलिसांची कारवाई
Arrested | (File Image)

MPSC Hacker Arrested: महाराष्ट्र लोगसेवा आयोगाच्या (MPSC) संकेतस्थळावरुन प्रवेशपत्रं बेकायदेशीरपणे डाऊनलोड (Hall Ticket Leak Case) केलेप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीस अटक केली आहे. रोहित दत्तात्रय कांबळे असे या व्यक्तीचे नाव असून तो केवळ 19 वर्षांचा तरुण आहे. नवी मुंबई सायबर सेल (Navi Mumbai Cyber Cell) पोलिसांनी त्याला पुणे येथून अटक केली. रोहित कांबळे हा काही हॅकर्सच्या संपर्कात असल्याचे आढळून आले आहे. हे हॅकर्स डार्कनेटवर सक्रीय असल्याची माहिती पोलिसांना (Navi Mumbai Police) मिळाली आहे. रोहित कांबळे याने संयुक्त पूर्व परीक्षेची तब्बल 94,195 हॉल तिकीटे बेकायदेशीररित्या डाऊनलोड करण्यात आली होती.

गट ‘ब’ आणि गट ‘क’च्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या उमेदवारांची हॉल तिकिटे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या संकेतस्थळावर 28 एप्रिल रोजी टाकली होती. उमेदवारांना सोईचे व्हावे यासाठी एमपीएससीने ही हॉल तिकीटे आयोगाने बाह्य लिंकद्वारे अपलोड केली होती. दरम्यान, हाच सांधा पकडत अज्ञात हॅकरने आयोगाच्या संकेतस्थळावर बेकायदेशीररित्या प्रवेश केला आणि त्यावरील माहिती अनधिकृतरित्या प्राप्त केली. पुढे त्याने त्याच माहितीचा वापर करत उमेदवारांची तब्बल 94,195 हॉल तिकीटे बेकायदेशीररित्या डाऊनलोड करुन व्हायरल केले. ही सर्व हॉल तिकीटे 'एमपीएससी 2023 ए' या टेलिग्राम चॅनलवर प्रसारीत झाली होती. (हेही वाचा, MPSC: संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ची प्रवेशप्रमाणपत्रे टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिले स्पष्टीकरण, घ्या जाणून)

एमपीएससी हॉल तिकीटे व्हायरल झाल्याचे कळताच विद्यार्थी, पालक, परीक्षार्थी आणि राज्याच्या राजकीय वर्तुळातही मोठा गदारोळ झाला. प्रसारमाध्यमांतून बातम्या झळकल्या. या प्रकरणात एमपीएससी आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी नवी मुंबई पोलिसांकडे धाव घेत सायबर सेलकडे याबाबत रितसर तक्रार नोंदवली. त्यानंततर सायबर सेलने तपास हाती घेऊन चौकशीला सुरुवात केली. पोलिसांनी हॅकरने वापरलेला आयपी अॅड्रेस मिळवून तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितआरोपी रोहित कांबळे याला त्याच्या घरुन अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला 1 डेस्कटॉप, 1 लॅपटॉप, 3 मोबाईल फोन आणि एक इंटरनेट राऊटर, असे साहित्य जप्त केले.