मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर वेग मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनचालकांना 1000 रुपयांचा दंड; 1 ऑगस्टपासून नियम लागू
Mumbai Pune Expressway (Photo Credits: Facebook)

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे (Mumbai Pune Expressway) वरुन प्रवास करताना वाहनांचा वेग वाढल्यास आता महाराष्ट्र हायवे पोलिस (State Highway Police) दंड आकारणार आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे वरील दोन टोलनाक्यांमधील 50 किमीचे अंतर 37 मिनिटांपेक्षा कमी वेळेत पार करणाऱ्या प्रवाशांकडून 1000 रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. हा नवा नियम 1 ऑगस्टपासून लागू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या पुणे-औरंगाबाद विभागाचे चीफ इंजिनियर दिलीप उकिरडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनचालाकांच्या वेगाचा डेटा मिळवण्यासाठी हायवे पोलिस MSRDC सह काम करणार आहेत.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कायदेशीर वेग मर्यादेत गाडी चालवल्यास खालापूर आणि उर्से या दोन टोलनाक्यांमधील 50 किमीचे अंतर पार करण्यासाठी 37 मिनिटे लागतात. दरम्यान या नियमांचे पालन न करण्यांना ई-चलन देण्यात येईल. तर पहिल्यांना वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकाला 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येईल. तर सातत्याने नियम मोडणाऱ्यांकडून अधिक दंड वसूल केला जाईल. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर सातत्याने होत असलेले अपघात लक्षात घेता राज्य महामार्ग पोलिसांनी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. (मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे अपघात: महामार्गावरील चुकीच्या पार्किंगमुळे 2 वर्षांत 106 जणांचा मृत्यू)

कोरोना व्हायरस संकटामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आला होता. परंतु, कालांतराने हा महामार्ग पुन्हा प्रवासासाठी खुला करण्यात आला. तेव्हापासून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक वाहनचालकांकडून दंड आकारण्यात आला आहे. दरम्यान या नव्या नियमांमुळे वाहनांच्या भरमसाठ वेगाला आळा बसेल आणि मुंबई पुणे महामार्गावरील अपघात टाळण्यास नक्कीच मदत होईल.