औरंगाबादच्या Bajaj Auto कंपनीत 250 पेक्षा जास्त कामगारांना कोरोना विषाणूची लागण; कंपनी तात्पुरती बंद व कामगारांची 50 टक्के पगार कपात होण्याची शक्यता
Coronavirus (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशात मार्चमध्ये लॉक डाऊन सुरु झाले होते. त्यानंतर तीन महिन्यांनी त्यामध्ये थोडी शिथिलता आणली गेली. आता राज्यातील काही ठिकाणी नियमांचे पालन करून कंपन्या सुरु झाल्या आहेत, मात्र अजूनही कोरोनाचा धोका टळला नाही. औरंगाबाद (Aurangabad) च्या वाळूंज एमआयडीसी (MIDC) मध्ये कार्यरत असलेल्या बजाज ऑटो (Bajaj Auto) मध्ये तब्बल 250 कामगारांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यानंतर आता कामगारांकडून कंपनी काही दिवस बंद ठेवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कंपनीने 26 जून रोजी सांगितले होते की, कारखान्यातील 8000 कर्मचार्‍यांपैकी 79 कर्मचार्‍यांनी कोरोना विषाणूची लागण झाली आहे आणि दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. कंपनीने या आठवड्यात कर्मचार्‍यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जे कामगार कामावर येणार नाहीत, त्यांचे पैसे कापले जातील. याबाबत बजाज ऑटो कामगार संघटनेचे अध्यक्ष बाजीराव म्हणाले. ‘लोक कामावर येण्यास घाबरत आहेत मात्र अजूनही अनेक लोक कामावर येत आहेत, तर काही लोकांनी राजा घेतली आहे. कोरोनाची सायकल खंडित करण्यासाठी आम्ही कंपनीला 10-15 दिवसांसाठी तात्पुरते हा प्रकल्प बंद करण्याची विनंती केली, पण त्यांनी ते ऐकले नाही. ते म्हणाले. कामानंतर लोक सार्वजनिक ठिकाणी एकत्र येतच आहेत, त्यामुळे कंपनी बंद ठेवण्याचा उपयोग नाही. (हेही वाचा:  मुंबईमध्ये आज 806 जणांना कोरोना विषाणूची लागण; एकूण संक्रमितांची संख्या 86,132 वर)

बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी केली आहे. सीएनबीसी-टीव्ही18 शी बोलताना बजाज म्हणाले, अद्याप कामगारांच्या पगाराची कपात झाली नाही, परंतु आणखी कडक लॉक डाऊन लागू झाल्यास कामगारांचा पगार 50 टक्क्यांनी कमी करावा लागेल. वाळूंज प्रकल्पाची उत्पादन क्षमता 3.3 दशलक्ष मोटार बाईक व इतर वाहनांची असून, भारतात बजाजच्या एकूण उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा जास्त उत्पादन या एका ठिकाणी होते. दरम्यान, स्थानिक अधिकाऱ्यांनी 10 ते 18 जुलै दरम्यान शहर व औद्योगिक क्षेत्रात लॉक डाऊन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.