अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik), त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्या- सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मे. मलिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये कुर्ला (पश्चिम) येथील गोवावाला कंपाऊंड, कुर्ला पश्चिम येथील एक व्यावसायिक युनिट, उस्मानाबाद येथील 59.81 हेक्टर (एकूण क्षेत्रफळ 147.794 एकर) शेतजमीन, कुर्ला पश्चिम येथील तीन फ्लॅट आणि वांद्रे पश्चिम येथील दोन निवासी सदनिका यांचा समावेश आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांशी मलिक यांचे कनेक्शन असल्याचा ईडीचा आरोप आहे. दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून नवाब मलिकने कुर्ला येथील 3 एकर जमीन खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. एनआयएने या वर्षी 3 फेब्रुवारी रोजी त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. सध्या नवाब मलिक यांच्याविरोधात मनी लॉण्ड्रिंग प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. ईडीने फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
या एफआयआरमध्ये दाऊद इब्राहिम कासकर, हाजी अनीस उर्फ अनीस इब्राहिम शेख, शकील शेख उर्फ छोटा शकील, जावेद पटेल उर्फ जावेद चिकना, इब्राहिम मुश्ताक अब्दुल रज्जाक मेमन उर्फ टायगर मेमन यांची नावे आहेत. एफआयआरमध्ये असेही म्हटले आहे की दाऊद इब्राहिमने भारत सोडल्यानंतर, त्याचे जवळचे सहकारी आणि बहीण हसिना पारकर आणि इतरांद्वारे भारतात त्याच्या गुन्हेगारी कारवाया नियंत्रित करण्यास सुरुवात केली होती.
ईडीने केलेल्या तपासात असे उघड झाले आहे की, एका प्रकरणात मुनिरा प्लंबरची मालमत्ता नवाब मलिक यांनी मेसर्स सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून हसीना पारकरसह डी-गँगच्या सदस्यांच्या सक्रिय संगनमताने हडप केली होती. ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची कंपनी असून ती नवाब मलिक यांच्याद्वारे नियंत्रणाखाली आहे. (हेही वाचा: Raj Thackeray यांच्यावर ठाण्यातील नौपाडा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल; उत्तरसभेत तलवार दाखवल्यामुळे Arms Act अंतर्गत कारवाई)
या मालमत्तेचे 11.70 कोटी रुपयांचे भाडे नवाब मलिक यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या मेसर्स सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स मलिक इन्फ्रास्ट्रक्चर या दोन संस्थांकडून प्राप्त झाले आहे. आता त्यानुसार, ईडीने मलिक यांच्यावर तात्पुरती कारवाई करत, त्यांच्या नावावरील मालमत्ता जप्त केल्या आहेत.