Mobile Clinics for Women: मुंबईसह राज्यात महिलांसाठी फिरता दवाखाना; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
Rajesh Tope (Photo Credits: Twitter)

मुंबईसह राज्यात महिलांसाठी फिरता दवाखाना (Mobile Clinic) असेल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे. हा दवाखाना अत्याधुनिक आणि अद्यावत असेल. तसंच नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून ही सेवा सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे राज्याच्या ग्रामीण भागातही फिरत्या दवाखान्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात जनता दरबार उपक्रमासाठी आले असता राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi thackeray) यांच्या हस्ते या फिरत्या दवाखानाच्या उद्घाटन करण्यात येईल.

फिरत्या दवाखान्यात टेस्टिंग, लॅब, 81 प्रकारची औषधं, 40 प्रकारच्या टेस्ट, सोनोग्राफी यांची सुविधा असणार आहे. त्याचबरोबर महिलांचे बाळंतपण करण्याचीही सोय असेल. गरोदर महिलांना रुग्णालयात आणणे, त्यांच्या घरी सुरक्षित पोहचवणे यासाठी फिरता दवाखाना अतिशय उपयुक्त ठरेल. (COVID19 च्या लसीबद्दल पाठवल्या जाणाऱ्या फेक लिंक बद्दल पोलिसांनी नागरिकांना केले सतर्क)

ग्रामीण भागात प्रत्येक जिल्ह्यात 2-2 फिरते दवाखाने असणार आहेत. टप्प्याटप्प्याने या दवाखान्यांच्या संख्येत वाढ केली जाईल. याचा चांगला परिणाम होईल, असंही राजेश टोपे यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी संकट कायम आहे. कालच्या अपडेटनुसार, राज्यात काल 1,927 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून 4,011 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत तब्बल 19,36,305 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 41,586 सक्रीय रुग्ण असून रिकव्हरी रेट 95.37% इतका झाला आहे. विशेष म्हणजे राज्यातही कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे.