महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) फॉक्सकॉन (Foxconn Project) प्रकल्पावरुन जोरदार आक्रमक झाले आहेत. फॉक्सकॉनसारखा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेलाच कसा? या प्रकल्पाबाबत नेमकी बोलणी काय झाली. नेमके कोणते मुद्दे फॉक्सकॉनला (Raj Thackeray on Foxconn) योग्य वाटले नाहीत. त्यांना उद्योगाच्या बाबतीत कोणी पैसे मागितले का? या सर्व गोष्टींची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी या वेळी केली. नागपूर दौऱ्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाराष्ट्रातील राजकारण्यांचे प्रचंड दुर्लक्ष आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. महाराष्ट्रापेक्षा गुजरातने फॉक्सकॉनला अधिक चांगली ऑफर दिली असावी. त्यामुळेच हा प्रकल्प गुजरातला गेला असेल, असे राज ठाकरे म्हणाले. या वेळी राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. लोकांना गृहीत धरुन फसवणाऱ्यांना आता लोकांनीच धडा शिकवायला हवा. असे ते म्हणाले.
वेगळ्या विदर्भाबाबत जनमत घ्या
वेगळ्या विदर्भाचा मुद्दा वारंवार चर्चेला येतो. या विषयावरुन बोलताना राज ठाकरे म्हणाले. वारंवार एकाच मुद्द्याची चर्चा करण्यापेक्षा सरळ जनमत घ्यावे. लोकच ठरवतील त्यांना महाराष्ट्रात राहणे योग्य की वेगळा विदर्भ हवा. जसे ब्रिक्सबाबत जनमत चाचणी झाली. तशीच चाचणी वेगवळ्या विदर्भाबाबत घ्यावी, असे ते म्हणाले. (हेही वाचा, https://marathi.latestly.com/maharashtra/nagpur-mns-executive-dismissed-by-raj-thackeray-405290.html)
नागपूर मसने कार्यकारिणी बरखास्त
दरम्यान, राज ठाकरे यांनी आज यांनी नागपूर दौऱ्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दणका दिला आहे. नागपूर मनसेची (Nagpur MNS) कार्यकारिणीच राज ठाकरे यांनी बरखास्त केली. पक्ष स्थापनेला आज 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. या सोळा वर्षांमध्ये उर्वरीत महाराष्ट्रात मला पक्ष जसा दिसतो, तसा मला नागपूरमध्ये पाहायला मिळत नाही. त्यामुळे संघटनेच्या पुनर्बांधणीसाठी पुन्हा नव्याने सुरुवात केली जाईल. घटस्थापनेनंतर कोल्हापूर, कोकण दौरा होईल. त्यानंतर नागपूर मनसे कार्यकारिणी पुन्हा नव्याने जाहीर केली जाईल, अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. नागपूर दौऱ्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलत होते.
नागपूरमध्ये मनसे भाजप विरोधात लढणार
राज ठाकरे यांनी म्हटले की, राजकारणात जे जे पक्ष पुढे येतात ते सर्वजण प्रस्थापितांविरोधात लढूनच पुढे येतात. नागपूरबाबत बोलायचे तर नागपूर हा एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. आता या ठिकाणी भाजपचा बालेकिल्ला पाहायला मिळतो. नागपूरमध्ये मनसेला जिंकायचेतर भाजपविरोधात लढायला हवे. या वेळी त्यांनी आगामी काळात आपण थेट भाजपसोबत लढू असा इशारा दिला. तसेच, आगामी काळात भाजपशी युती करण्याच्या मनस्थितीत मनसे नसल्याचेही संकेत दिले.
मनसे-भाजप युती किंवा महाविकासाघाडी सरकारबद्दल मनसेची भूमिका याबाबत प्रसारमाध्यमांतून काही बातम्या येत आहेत. या सर्व बातम्या निराधार आहेत. खरे तर या बातम्यांचा स्त्रोत मी स्वत:च शोधतो आहे, अशी मिश्कीट टिप्पणीही राज ठाकरे यांनी केली. दरम्यान, सध्याच्या राजकारणात राजकीय टीकेपेक्षा व्यक्तीगत टिकेला फार महत्त्व दिले जात आहे. ज्यामुळे राजकारणातील आणि व्यक्तीगतही संबंध बिघडले जात आहेत, अशी नाराजीही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.