कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) काळात वाढीव वीजबिलवाढीचा (Additional Electricity Bill) जबरदस्त झटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. यामुळे लोक रस्त्यावर उतरले असून अनेक राजकीय पक्ष देखील राज्य सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. याप्रकरणी आता मनसेनेही (MNS) पुढाकार घेतला असून येत्या सोमवारपर्यंत वाढीव वीजबिलं माफ करा अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राज्य सरकारला देण्यात आला आहे. असा अल्टिमेटम मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांनी वाढीव वीजबिलवाढीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या त्रासातून नागरिकांची सुटका करण्यासाठी मनसेने ठोस पावले उचलली आहेत. सरकारला ठिकाण्यावर आणण्यासाठी मनसेच्या आंदोलनात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं, जर वीज मंडळाचे कर्मचारी वीज कनेक्शन कापायला आले तर मनसेचे कार्यकर्ते ग्राहकांसोबत असतील. त्यामुळे नागरिकांनी घाबरु नये, वाढीव वीजबिलं भरु नयेत, असं आवाहनंही नांदगावकर यांनी केलं आहे. हेदेखील वाचा- ठाणे: वाढीव वीजबिलाविरोधात आता मनसे रस्त्यावर उतरणार, अविनाश जाधव यांनी दिला इशारा
वाढीव वीजबिलं माफ करण्याबाबत राज ठाकरे स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटले होते. त्यावेळी त्यांना निवेदनं देण्यास सांगण्यात आले. त्यावर विविध कंपन्यांची निवेदनंही पवारांकडे पाठवण्यात आली. मात्र, त्यावर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. आम्हाल शरद पवारांवर विश्वास आहे, पण आता त्यांनाही सरकारमध्ये किंमत राहिलेली नाही असं आम्हाला वाटतं असेही ते यावेळी म्हणाले.
सोमवारपर्यंत यावर निर्णय झाला नाही तर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयांवर मनसेकडून मोर्चे काढण्यात येतील तसेच राज्यभर मनसे स्टाइल आंदोलने केली जातील. यावेळी जर उद्रेक झाला तर त्याची जबाबदारी सरकारची असेल असा इशाराही यावेळी नादंगावकर यांनी दिला आहे.