अमरावतीचे बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. रवी राणा यांच्या कुटुंबामधील त्यांचे आई - वडील, दोन्ही मुलं, पत्नी खासदार नवनीत राणा यांच्या सह 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. फेसबूक पोस्ट मध्ये रवी राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'गेल्या 4 दिवसापासून नागपूर येथील वोकार्ट हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या कोरोनाग्रस्त आई वडिलांची सेवा करता करता त्यांना कोरोनाची लागण झाली. थोडा ताप व खोकलाअशी लक्षणं समोर आल्यानंतर नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डीन डॉक्टर श्री शैजल मित्रा यांचे देखरेखीखालीत्यांची कोविड टेस्ट करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान रवी राणा यांनी मागील काही दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी तसेच पुरेशी काळजी घ्यावी असं आवाहन केले आहे.
रवी राणा फेसबूक पोस्ट
दरम्यान रवी राणा यांचे आई-वडील आणि अन्य कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती तेव्हाच राणा दांम्पत्याचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र त्यावेळेस तो निगेटीव्ह आला होता मात्र आता या कुटुंबात 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आले आहे.
महाराष्ट्रात सध्या कोरोना बाधित रूग्णांचा आकडा 4,79,779 पर्यंत पोहचला आहे. हळूहळू रूग्णांचा रिकव्हरी रेट सुधारत आहे. मात्र लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. हात स्वच्छ धुणं, मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सध्या राज्यात 31 ऑगस्टपर्यंत काही प्रमाणात लॉकडाऊन लागू आहे.