सांताक्रूझ आणि विलेपार्ले स्टेशनमधील 'Milan Subway' दुरुस्तीसाठी राहणार बंद
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : IndustryWeek)

सांताक्रूझ आणि विले पार्ले स्टेशन यांच्या मध्ये असणारा ‘मिलन सबवे’ (Milan Subway) हा डागडूजीच्या कामासाठी 4 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत रात्री बंद असणार आहे. म्हणजे या 30 दिवसांत नागरिकांना या सबवेचा रात्री 12 ते सकाळी 5 वाजेपर्यंत वापर करता येणार नाही. या गजबजलेल्या भागात नागरिकांना दिवसा ट्राफिकचा सामना करावा लागतो, मात्र आता रात्रीही वाहतूक कोंडीची समस्या उद्भवणार आहे. त्यामुळे या सबवे वापर करणाऱ्या नागरिकांना इतर पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागणार आहे.

याचसोबत सध्या मध्य रेल्वेकडून काही ठिकाणी रेल्वेच्या पुलाच्या बांधकामाचे काम हाती घेण्यात आले आहे. धोकादायक अवस्थेत असलेला कल्याण दिशेकडील जुन्या पादचारी पुलाची दुरुस्ती मध्य रेल्वे करणार आहे. हा पूल 2 फेब्रुवारीपासून हा पूल 69 दिवस बंद राहणार आहे. दुरुस्तीचा पहिला टप्पा 2 फेब्रुवारी ते 11 एप्रिल (69 दिवस) असा आहे. या काळात पुलावरून फलाट क्रमांक 2 आणि 3 वरील प्रवेश बंद राहील. तर दुसऱ्या टप्प्याचे काम 49 दिवसांचे असून 22 फेब्रुवारीपासून ते सुरू होईल. या काळात पुलावरून फलाट क्रमांक 4, 5/6, 7/8, 9/10 वरील प्रवेश बंद राहील.