Migrant Workers are walking on Mumbai-Nashik highway | (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरस लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका रोजंदारी कामगारांना बसला आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणारे मजूर यांच्यापुढे अनेक समस्या उभ्या राहिल्या. उद्योगधंदे, व्यवसाय बंद असल्याने बेरोजगारीची वेळ त्यांच्यावर आली. तर वाहतूक ठप्प असल्याने घरी परतण्याचा मार्गही बंद झाला. त्यामुळे अनेक मजूरांनी पायीच आपल्या घरची वाट धरली. यापूर्वी अनेक मजूरांनी पायपीट करतच घर गाठले आहे. दरम्यान लॉकाडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात मजूरांना घरी परतण्याची परवानगी देण्यात आली असून त्यांच्यासाठी विशेष श्रमिक ट्रेन्सची सुविधाही सरकारने उपलब्ध केली आहे. तरी देखील अनेक मजूर पायीच घरी जाताना दिसत आहे. विविध राज्यात राहणारे अनेक मजूर मुंबई-नाशिक हायवेवरुन पायी घर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. (Lockdown: लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या विद्यार्थी, पर्यटक, प्रवासी, नागरिकांसाठी विशेष 'श्रमिक' ट्रेन सुरु; जाणून घ्या तिकीट बुकींग करण्याची पद्धत)

प्रवासादरम्यान पैशाअभावी त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. स्थलांतरीत मजूरांपैकी एक प्रिती कुमारी या उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे राहत असून आपल्या लहान मुलासह त्यांनी मुंबई-नाशिक महामार्गावरून पायी प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यांनी सांगितले की, "माझ्याकडे पैसे नाहीत. मी माझ्या मुलांना काय खायला देऊ? प्रवासादरम्यान मी त्याला केवळ बिस्कीट दिले आहे."

ANI Tweet:

दरम्यान स्थलांतरीत कामगारांसाठी श्रमिक ट्रेन सुरु करण्यात आली असून त्याच्या तिकीट दरावरुन एकच गदारोळ उसळला होता. मात्र काँग्रेसने पुढाकार घेत तिकीट खर्चाचा भार उचलण्याचा निर्णय घेतला. सोनिया गांधींच्या या निर्णयाने कामगारांना नक्कीच दिलासा मिळाला. दरम्यान स्थलांतरीत कामगारांकडून तिकीटाचे पैसे घेऊ नका, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला केली होती.