भारत देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हयरसचं संकट अधिक गंभीर होत असल्याने आता राज्यात होणारी यंदाची MHT CET 2020 परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. या परीक्षेचं 13 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान आयोजन करण्यात आलं होतं मात्र आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची महिती देण्यात आली आहे. cetcell.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच परीक्षेचं नवं वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे. यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, 5 एप्रिलला सीईटी परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड प्रसिद्ध केली जाणं अपेक्षित होतं. मात्र आता ही तारीख देखील पुढे ढकलण्यात येईल. या परीक्षेबाबत अधिक माहिती देण्यासाठी इथे सविस्तर जारी करण्यात आलेली नोटीस वाचू शकता .
MHT-CET ही परीक्षा PCM आणि PCB अशा दोन ग्रुपमध्ये घेतली जाते. मल्टिपल चॉईस प्रश्नांमध्ये 4 उत्तरांचे पर्याय आहेत. दोन शिफ्टमध्ये ही परीक्षा घेतली जाणार होती. दरम्यान पहिली शिफ्ट सकाळी 9 ते 12 मध्ये होती तर दुसरी शिफ्ट दुपारी 2 ते 5 यावेळात आयोजित केली होती. विद्यार्थ्यांना PCM आणि PCB या एका ग्रुप ची किंवा दोन्ही ग्रुपची परीक्षा देण्याची मुभा विद्यार्थांना असते. MAH MCA CET 2020 Exam कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे 28 मार्च ऐवजी 30 एप्रिलला; mahacet.org जाणून घ्या अधिक माहिती.
दरम्यान महाराष्ट्रात 12 वीची परीक्षा झाल्यानंतर या सीईटी परीक्षा पार पडते. मात्र कोरोना संकटामुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी शिक्षण मंडळाने 1-8 वीच्या परीक्षा रद्द झाल्याचं स्पष्ट केलं आहे. तर 10वीच्या भूगोल विषयाचा पेपर लांबणीवर टाकण्यात आला आहे. तर मुंबई विद्यापीठाने देखील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा विळखा वाढत आहे. सध्या राज्यात 112 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी पुण्यात आढळलेले पहिले दोन रूग्ण यांना आज नायडू रूग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले आहे. तर 48 जणांची स्थिती सुधारत आहे.