MHADA | Facebook

मुंबई या स्वप्ननगरीमध्ये स्वतःचं हक्काचं घर असावं अशी अनेकांची इच्छा असते. या स्वप्नाला सामान्य लोकांच्या कवेत आणण्यासाठी म्हाडा (Maharashtra Housing and Area Development Authority) विविध भागात घरांसाठी सोडत जाहीर करते. आता मुंबई मध्ये यंदा दिवाळीपूर्वी 5 हजारापेक्षा अधिक घरांची लॉटरी निघणार असल्याची माहिती म्हाडाचे सीईओ आणि उपाध्यक्ष संजीव जयस्वाल (Sanjeev Jaiswal) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. बीडीडी चाळ पुनर्विकासातील काही घरांच्या चाव्या देखील मे महिन्यात दिल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही म्हाडाने पुढील वर्षभरात मुंबईसह राज्यात 19,497 घरं बांधणीचं उद्दिष्ट ठेवलं असून मुंबईत 5199 घरं बांधली जाणार आहेत.अशी माहिती देताना त्यांची लॉटरी देखील दिवाळीपूर्वी निघेल असं म्हटलं आहे.

मुंबई मध्ये म्हाडा घरांची लॉटरी कधी, कुठे?

मुंबई मध्ये म्हाडाच्या घरांची लॉटरी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात निघणार आहे. 5-6 हजार घरांचा यामध्ये समावेश असणार असून ही घरं म्हाडाकडून विक्रोळी, गोरेगाव, बोरिवली भागात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ही लॉटरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईडब्ल्यूएस), अल्प उत्पन्न गट (एलआयजी), मध्यम उत्पन्न गट (एमआयजी) आणि उच्च उत्पन्न गट (एचआयजी) या सर्व प्रवर्गांसाठी असेल.

बाजारभावापेक्षा कमी दरामध्ये म्हाडा कडून घरं उपलब्ध करून दिली जात असल्याने या घरांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येतात. मुंबईतील आगामी लॉटरीसाठीही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा म्हाडा कडून करण्यात आली आहे. नक्की वाचा: MHADA Housing Units: म्हाडाचे 2025-26 या आर्थिक वर्षात राज्यभरात 19,497 घरे बांधण्याचे उद्दिष्ट; मुंबई मंडळांतर्गत 5,199 युनिट्स .

आता म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आणि पोर्टल द्वारा सुकर करण्यात आली आहे. त्यामुळे फसवणूकीचे प्रकार देखील कमी झाले आहेत. म्हाडाच्या घरासाठी अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष आणि अन्य तपशील लवकरच म्हाडाकडून  जाहीर केले जातील.