मराठा आरक्षणानंतर राज्यात विविध पदांसाठी मेगाभरतीची घोषणा झाली. त्यांनतर शिक्षणमंत्र्यांनी ‘शिक्षक भरती’ची घोषणा केली. आता राज्यामध्ये दुष्काळग्रस्त 15 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (MSRTC) कडून तब्बल 4242 पदांची भरती केली जाणार आहे. दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील तरुणांना रोजगार मिळावा म्हणून ही मेगाभरती करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही माहिती दिली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात याबाबत जाहिरात प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यानंतर एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये या पदांसाठी परीक्षा घेण्यात येईल. मराठा समाजाला दिले गेलेले 16 आरक्षणही या भरतीसाठी लागू होणार आहे.
राज्यामधील औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक आणि पुणे अशा 15 जिल्ह्यांमध्ये ही भरती होणार आहे. सध्या बीड, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या जिल्ह्यात परिवहन मंडळात रिक्त जागा नाहीत, मात्र असे असले तरी या जिल्ह्यातील पात्र उमेदवारांची निवड करण्यात येऊन, त्यांना ज्या जिल्ह्यांमध्ये रिक्त जागा आहे आहेत तिथे नियुक्यता दिल्या जातील असे परिवहन मंडळाने स्पष्ट केले आहे. (हेही वाचा : मेगाभरतीनंतर राज्यात 'शिक्षक भरती'ची घोषणा; पाहा कोणत्या इयत्तांसाठी किती आहेत रिक्त जागा)
ही भरती दुष्काळग्रस्त भागासाठी असून या पदांसाठी अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय तसंच दुष्काळग्रस्त उमेदवारांना या पदांच्या परिक्षा शुल्कात 50 टक्कांची सवलत देण्यात येणार आहे. याचसोबत औरंगाबाद या स्मार्ट सिटीअंतर्गत राबविण्यात येणाऱया शहरात वाहतूक सुविधेची जबाबदारी एसटी महामंडळाने घेतली आहे. त्यासाठी या वहतूक योजनेत 5 कर्षांसाठी 560 कंत्राटी पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी 15 हजार रुपये वेतन दिले जाणार असून वार्षिक 500 पयांची वाढ केली जाणार आहे.