अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची उद्या सभा; फितुरांना तंबी देणार का? महाराष्ट्राचे लक्ष
Congress President Rahul Gandhi | (Photo Credit: Facebook)

Lok Sabha Elections 2019: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे संगमनेर (Rahul Gandhi Sabha Sangamner) येथे शुक्रवारी (26 एप्रिल 2019) सायंकाळी पाच वाजता जाहीर सभा घेणार आहेत. शिर्डी (Shirdi) लोकसभा मतदारसंघ काँग्रेस उमेदवार भाऊसाहेब कांबळे (Bhausaheb Kamble) आणि नाशिक (Nashik) लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) तसेच दिंडोरी (Dindori) लोकसभा मतदारसंघ उमेदवार धनराज महाले (Dhanraj Mahale) यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राहुल गांधी यांनी मुंबई वगळता उर्वरीत महाराष्ट्रात फारशा सभा घेतल्या नव्हत्या. मात्र, राहुल गांधी यांच्या सभांना देशभरात मिळत असलेला पाठिंबा पाहता महाराष्ट्रात या सभेला कसा प्रतिसाद मिळेल. तसेच, या सभेत राहुल गांधी काय बोलतील याबाबत उत्सुकता आहे.

काँग्रेसमध्ये उत्सुकता आणि उत्साह

सुरुवातीला राहुल गांधी यांची उद्या (26 एप्रिल 2019) संगमनेर येथे पार पडत असलेली सभा ही नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे आयोजित करण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव सभास्थळात बदल करत ही सभा संगमनेर येथील जाणता राजा मैदानावर आयोजित करण्यात आली. राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यापासून आतापर्यंत ते एकदाही नगर जिल्ह्यात आले नाहीत. त्यामुळे उद्या पार पडत असलेल्या संगमनेर येथील सभेबाबत काँग्रेसध्ये उत्सुकता आणि उत्साहाचे वातावरण आहे.

पक्षाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच अहमदनगरमध्ये

दरम्यान, दुसऱ्या बाजूला नगर हा काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रभावक्षेत्र असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. नगर जिल्ह्यात शिर्डी आणि नगर असे दोन लोकसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी शिर्डी लोकसभा मतदारसंघावर आरक्षण आहे. तर, अहमदनगर लोकसभा मतदारसंघ आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील हे येथून लोकसभेसाठी इच्छुक होते. मात्र, राष्ट्रवादीने हा मतदारसंघ सोडायला नकार दिल्याने विखे पाटील यांची गोची झाली. परिणामी काहीही करेन पण लोकसभा लढवेनच या हट्टाला पेटलेल्या विखेपाटील चिरंजीव सुजय यांनी पक्षांतर करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला.

राहुल गांधी फितूरांना तंबी देणा काय?

दरम्यान, अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आपण आघाडी उमदवाराचा (संग्राम पाटील, राष्ट्रवादी) प्रचार करणार नाही अशी जाहीर भूमिका राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. या पार्श्वभूमिवर राहुल गांधी काही भाष्य करणार का? निवडणुकीच्या तोंडावर केवळ उमेदवारी मिळाली नाही म्हणून किंवा व्यक्तिगत स्वार्थासाठी पक्ष अडचणीत असताना पक्षांतर किंवा पक्षविरोधी काम करणाऱ्या फितूरांना राहुल गांधी काही सज्जड दम भरणार का? याबाबत उत्सुकता आहे.(हेही वाचा, महाराष्ट्राचे राजकारण ढवळून टाकणारे बहुचर्चीत लोकसभा मतदारसंघ आणि लक्ष्यवेधी लढती)

आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती लक्षणीय

राहुल यांच्या सभेवेळी शक्तीप्रदर्शन करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते. या सभेला महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे, आमदार डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, शिर्डी लोकसभेचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे, समीर भुजबळ, करण ससाणे यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते व नगर, नाशिक जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार, आजी-माजी पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे काँग्रेस गोटातून सांगण्यात येत आहे.