Mask | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Mask Compulsion in Government Office in Nagpur: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे (Coronavirus New Variant) जगभरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. चीन (China) मध्ये या व्हेरिएंटच्या संसर्गाने हाहाकार माजवला आहे. चीनमधील परिस्थिती पाहून जगातील सर्व देश खबरदारी पाळताना दिसत आहेत. भारतानेदेखील कोरोनाच्या नव्या व्हेरिएंन्टची धास्ती घेतली आहे. या विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारतातील सर्व आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. याशिवाय नागपुर (Nagpur) मध्ये प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शासकीस आणि निम शासकीय कार्यालयात मास्क (Mask) घालणे बंधनकारक केलं आहे. तथापी, शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना देखील मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सर्व आरोग्य यंत्रणांना सूचना दिल्या आहेत. याच पार्श्ववभूमीवर नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क लावण्याचा सूचना दिल्या आहेत. नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. पुढचे काही दिवस हे अधिवेशन चालणार आहे. त्यामुळे शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वेळीचं उपाययोजना केल्या जात आहेत. (हेही वाचा - Coronavirus In Agra: चीनमधून परतलेल्या तरुणाला कोरोनाची लागण; तरुणांच्या संपर्कात असलेल्या लोकांची होणार तपासणी)

दरम्यान, आंतरराष्ट्रीय विमान तळावर परदेशातून येणाऱ्या नागरिकांची यादृच्छिक चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे नागपुरात येणाऱ्या प्रवाशांचीदेखील कोरोना चाचणी करण्यात येत आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी निर्देश दिले आहेत. तथापी, जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क लावण्या संदर्भात केलेल्या सुचनांमध्ये शासकीय व निमशासकीय कार्यालयात मास्क लावणे बंधनकारक असल्याचं सांगितलं आहे.

कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर देशभरात खबरदारी घेण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राज्यातील सर्व आरोग्य मंत्र्यांची बैठक बोलावून यासंदर्भात सूचना केल्या आहेत. दरम्यान, आज आग्रा येथे चीनवरून आलेल्या एका तरुणाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.