जगात चीन, अमेरिका, जपान सह काही महत्त्वाच्या आणि मोठ्या देशांमध्ये पुन्हा कोरोना (Corona) डोकं वर काढत आहे. यामुळे भारतातही प्रशासन अलर्ट मोड वर आले आहे. नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचे बंधन घालण्यात आलं आहे. सध्या सणासुदीचा, सेलिब्रेशनचा काळ सुरू आहे. नाताळ आणि आठवड्याने येणारं नववर्ष यानिमित्त सार्वजनिक ठिकाणी मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. अनेकजण नववर्षाची सुरूवात ही मंदिरांमध्ये देवदर्शन करून करतात. मग यंदा तुम्हीही महाराष्ट्रात नववर्षानिमित्त मंदिरांना भेट देणार असाल तर पहा महाराष्ट्रातील शिर्डी साईबाबा मंदिर देवस्थान (Shirdi Saibaba Mandir) ते अगदी करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात (Mahalaxmi Temple Kolhapur) कोरोनाच्या वाढत्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर काय नियम करण्यात आले आहेत? (नक्की वाचा: Covid-19 BF.7 Variant: कोरोनाच्या नव्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर IMA ने जारी केली अॅडव्हायजरी; देशवासियांना दिला 'हा' सल्ला).
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर, कोल्हापूर
कोल्हापूरामध्ये अंबाबाईचं मंदिर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. त्यामुळे महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला हमखास भक्त येतात. सध्या या मंदिरात मास्क सक्ती करण्यात आली आहे. तुम्हांला मंदिरात जायचं असेल तर मास्क बंधनकारक आहे.
साईबाबा मंदिर देवस्थान, शिर्डी
साईनगरी हमखास नववर्षाच्या निमित्ताने फुललेली दिसते. यंदा विकेंडला नाताळ आणि नववर्ष आल्याने अनेकजण धार्मिकस्थळांना भेट देण्याची शक्यता आहे. साई मंदिरामध्ये लोकांना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर, नाशिक
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्येही वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मास्क सक्ती करण्यात आली आहे. सध्या नाशकात थंडीचा पारा देखील कमालीचा घसरला आहे.
स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट
सोलापूरातील अक्कलकोटात स्वामी समर्थांच्या मठात भाविकांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. जर भाविक विना मास्क आले तर त्यांना देवस्थानाकडून मास्क सध्या दिले जात आहेत.
सप्तश्रृंगी गड, नाशिक
नाशिकच्या सप्तशृंगी गडावर देखील भाविकांना मास्क घालणं बंधनकारक आहे.
कोरोनाच्या दहशतीमुळे पुन्हा नो मास्क नो एंट्री ची अंमलबजावणी केली जात आहे.
सिद्धिविनायक मंदिर, मुंबई
मुंबईच्या प्रभादेवी भागात असलेल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये पुन्हा मास्कसक्ती करण्यात आली आहे. वर्षभरत सिद्धिविनायक मंदिर भाविकांनी फुललेलंचं असतं. पण नववर्षाच्या काळात इथे विशेष गर्दी असते. देशा-परदेशातून हमखास भाविक इथे येत असल्याने आता पुन्हा मास्क बंधनकारक झाले आहेत.
दगडूशेठ गणपती, पुणे
पुण्यात दगडूशेठ गणपती प्रशासनाकडून भाविकांना पुन्हा बाप्पाच्या दर्शनासाठी मास्कसक्ती करण्यात आली आहे. सध्या मंदिरात मास्क घालून न येणार्यांना मंदिर स्वतः मोफत मास्क उपलब्ध करून देत आहेत.
मुंबई,पुणे सह महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या मंदिरामध्ये सुरूवातीला केवळ कर्मचारी आणि पुजारी यांच्या साठी मास्कसक्ती करण्यात आली आहे. पण हळूहळू ती भाविकांवरही केली जात आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तुम्ही बाहेर पडताना मास्क घालणं, जवळ बाळगणं गरजेचं आहे.