Water| Representational Image | (Photo Credits: Wikimedia Commons)

महाराष्ट्रासह देशात यंदा पावसाचे आगमन उशीराने झाल्याने राज्यातील धरणातील पाणीसाठ्यावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. मराठवाड्यातील (Marathwada) धरणातील पाणीसाठी (Dam Water Storage) आता कमी होत आहे. मराठवाड्यातील 11 प्रमुख धरणात आज घडीला 33.48 टक्के पाणीसाठा (Water Storage) शिल्लक राहिला आहे. तर मराठवाड्याची तहान भागावणाऱ्या जायकवाडी धरणात 26.93 टक्केच पाणीसाठी शिल्लक आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातील (Jayakwadi Dam) पाणीसाठी आता पिण्यासाठी आरक्षीत करण्याचा निर्णय छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे जायकवाडी धरण 33 टक्के भरेपर्यंत जायकवाडी धरणातून पाणी सोडले जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (हेही वाचा - Pune Water Cut News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: शहरातील काही भागांत पाणी पुरवठा येत्या गुरुवारी बंद )

अशीच परिस्थिती राहिल्यास मराठवाड्यात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून देखील या दृष्टीने पाऊलं उचलली जात आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी जायकवाडी धरणातील पाणीसाठी आता पिण्यासाठी राखीव करण्याचा निर्णय घेतला आहे. धरणातील पाणीसाठा 33 टक्के होईपर्यंत आता धरणातून खाली पाणी न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठवाड्यात यंदा जून महिना कोरडा गेला आहे. त्यात जुलै महिन्यात देखील अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या झालेल्या नाही. मराठवाड्यात सध्या 20 टक्केच पेरण्या झाल्या आहेत. तसेच अशीच परिस्थिती राहिल्यास ज्यांनी पेरण्या केल्या आहेत त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट उभं राहण्याची शक्यता आहे.