प्रसिद्ध गायिका गीता माळी (Geeta Mali) यांचा आज (14 नोव्हेंबर) मुंबई- नाशिक महामार्गावर भीषण अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. गीता या प्रसिद्ध मराठी गायिका असून आजच सुमारे तीन महिन्यांचा अमेरिकेचा दौरा पूर्ण करून त्या भारतामध्ये परतल्या होत्या. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट वरून नाशिकला त्यांच्या मूळ घरी परताताना रस्त्यामध्येच काळाने त्यांच्यावर घाला घातला. एका टॅंकरला झालेल्या धडकेमध्ये गीता यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. यामध्ये जागीच गीता माळी यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या पतीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
गीता माळी यांच्या निधनाचे वृत्त समजताच सोशल मीडीयासह मराठी कलाक्षेत्रातील कलाकारांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार मुंबई- नाशिक महामार्गावर रस्त्यावर आडव्या आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या नादामध्ये गीता यांची कार रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या HP Gas टॅंकरला धडकली आणि या गंभीर अपघातामध्ये गीता माळी यांचा दुर्दैवी अंत झाला. गीता यांचे पती विजय माळी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
गीता माळी यांची शेवटची पोस्ट
गीता माळी यांनी आज मुंबईत उतरल्यानंतर सेल्फी पोस्ट केला होता. त्यवेळेस मायभूमीत परतल्याचा आनंद व्यक्त करताना जननी_जन्मभूमी_स्वर्ग_से_महान_है ! या कॅप्शनसह त्यांनी खास फोटो पोस्ट केले होते.
दरम्यान गीता माळी यांच्या पश्चात एक मुलगा आणि पती आहेत. गीता माळी यांनी संगीतामध्ये एम ए केले असून मागील काही वर्षांपासून मराठी संगीत क्षेत्रात त्यांच्या आवाजाने जादू केली आहे. मागील तीन महिन्यात त्यांनी अमेरिकेत न्युयॉर्क, जॉर्जिया, फ्लॉरिडा सारख्या शहरामध्ये संगीताचे कार्यक्रम केले आहेत.