महिला दिनानिमित्त मंत्रालयातील महिलांचे खास स्वागत | (Photo Credits: Twitter)

जागतिक महिला दिन (International Women's Day) अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीचा गौरव केला जातो. यंदाच्या महिला दिनानिमित्त ठाकरे सरकार मात्र नवा पायंडा घालत असल्याचे दिसून येत आहे. महिला दिनानिमित्त स्त्रियांचा समान्म करण्यासाठी ठाकरे सरकारने नवा प्रयोग केला. आज मंत्रालयात येणाऱ्या महिलांचे फुले आणि पत्र देऊन स्वागत करण्यात येत होते. मुख्यमंत्री सचिवालयाचे कर्मचारी हसतमुखाने हे काम करत होते. प्रत्येक महिलेच्या हातात पडणारे पत्र हे खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे होते. त्यामुळे मंत्रालयातील प्रत्येक महिलेसाठी हा एक सुखद धक्का होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने असलेल्या या पत्रात जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तसंच जिजाऊ, सावित्रीबाई यांसारख्या कर्तुत्वान महिलांचा महाराष्ट्राला प्रेरित करणाऱ्या इतिहासाल उजाळा देत त्यांनी आजच्या काळातील स्त्रियांचा देखील सन्मान केला आहे.  धकाधकीच्या जीवनात वैयक्तिक आयुष्यातील जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यासोबतच मंत्रालयातील कामाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासासाठी मोलाचे योगदान या महिला देत असल्याचे पत्रात म्हटले आहे. तसंच या योगदानाबद्दल मुख्यमंत्र्यांनी समस्त महिला वर्गाचे आभार मानले आहेत. (उद्धव ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज होणार सादर; शेतकरी, नोकरदार व महिलांसाठी काय असणार तरतुदी?)

पहा पोस्ट:

खरंतर महिलांचा सन्मान हा प्रत्येक दिवशी करायला हवा. मात्र महिला दिन हा आपल्या आयुष्यातील महिलांप्रती आपल्या मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याची एक संधी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही संधी अचूक साधत मंत्रालयातील समस्त महिलावर्गाचा सन्मान केला आहे.