कोरोना व्हायरसच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्य देखील 3 मे पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. त्यामुळे अनेक व्यवसाय, उद्योगधंदे ठप्प आहेत. तसंच नागरिकांना कामाशिवाय घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे इतर व्यवसायांप्रमाणे आंबा विक्रीला देखील लॉकडाऊनचा फटका बसला आहे. त्यामुळे आंबा विक्रेते चिंतातूर झाले आहेत. नाशिक येथील एका आंबा विक्रेत्याने सांगितले की, "कोरोना व्हायरसने यंदा आंबा विक्रीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम केला आहे. लोक बाजारात येत नसल्याने आंबा विक्री होत नाही. त्यामुळे आम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे." त्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने विक्रेत्यांसमोरील अडचणीही वाढल्या आहेत. (Coronavirus चा आंबा निर्यातीलाही फटका बसण्याची शक्यता)
आंबा हे लोकप्रिय फळ असून वर्षभर नागरिक आंब्याची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र आंब्याच्या कालावधीतच कोरोनाचे संकट आल्याने आंबा विक्रीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे याचा मोठा फटका विक्रेते व शेतकरी यांना बसत आहे.
ANI Tweet:
Maharashtra: Mango business has been severely affected due to countrywide lockdown, in wake of #Coronavirus outbreak. A trader in Nashik says,"#COVID19 has damaged mango business this year. Buyers are not coming to the market. We are facing difficulties." pic.twitter.com/SbjDc1uHK7
— ANI (@ANI) April 18, 2020
कोरोना व्हायरसचे संकट संपूर्ण जगावर असल्याने आंबा विक्रीसह आंबा निर्यातीवर देखील परिणाम झाला आहे. तसंच लॉकडाऊनमुळे शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. तोडणी न केल्यामुळे शेतमाल सडून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. मात्र 20 एप्रिल पासून शेती संबंधित सर्व काम, वाहतूक सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.