Mahatma Gandhi Baba Yatra Festival: महात्मा गांधी यांच्या नावाने भरते यात्रा, लातूर जिल्ह्यातील 'उजेड' गावाची देशभर चर्चा
Mahatma Gandhi | (Photo Credits: ANI)

Mahatma Gandhi Festival: एका बाजूला भारत आज प्रजासत्ताक दिन साजरा कोरतो आहे. त्यानिमित्त देशभरात विविध समारंभ आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्वांत महाराष्ट्रातील एका गावने राबवलेला उपक्रम मात्र सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरतो आहे. लातूर (Latur District) जिल्ह्यातील उजेड (Ujed Village) गावात हा उपक्रम राबवला जातो. हे गाव चक्क राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या नावाने यात्रा आयोजित करते. पाठिमागील अनेक वर्षांपासून या गावात हा उपक्रम राबवला जातो. विशेष म्हणजे 'राष्ट्रपिता महात्मा गांधीबाबा यात्रा महोत्सव' (Mahatma Gandhi Baba Yatra Festival) असे या यात्रेचे नाव असून ही यात्रा सलग पाच दिवस चालते. प्रतिवर्षी 24 ते 30 जानेवारी या कालावधीत हा उत्सव भरतो. या काळात महात्मा गांधी यांच्या मूर्तीचीही प्रतिष्ठापणा केली जाते.

'राष्ट्रपिता महात्मा गांधीबाबा यात्रा महोत्सव' हा गावासह पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. गावातील इतर कोणत्याही उत्सवाला येतात तसे नागरिक या उत्सवाला गर्दी करतात. गावातील लेकीबाळी माहेरी येतात. पाहुणे रावळे येतात. नोकरी, कामाधंद्यानिमित्त परगावी असलेले ग्रामस्थ तरुण गावात येतात. विचारांची देवाणघेवान होते. खास करुन उत्सव काळात थाटली जाणारी मेवा-मिठाईची दुकाने, आणि महात्मा गांधी यांच्या मूर्तीला घातला जाणारे हार येथ आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. 'राष्ट्रपिता महात्मा गांधीबाबा यात्रा महोत्सवा'त खरेदी होणारी जिलेबी हा देखील सर्वांच्या पर्वणीचा विषय ठरतो. सांगितले जाते की, या उत्सवात जिलेबी क्विटटलमध्ये विकली जाते. (हेही वाचा गांधी जयंती निमित्त त्यांचे मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp वर शेअर करत वंदन करुया बापूजींच्या स्मृतीला!)

गावकरी सांगतात की, याच गावात स्वातंत्र्यपूर्व काळात पिराची यात्रा भरत असे. परंतू, 1948 मध्ये हैदराबाद मुक्ती संग्रामादरम्यान, पोलिस कारवाई झाली आणि ही यात्राच बंद झाली. पुढे 1950 मध्ये भारत प्रजासत्ताक झाला. त्या वेळी गावकरी एकत्र आले. त्यांनी एकत्र येऊन बराच खल केला आणि मग 'राष्ट्रपिता महात्मा गांधीबाबा यात्रा महोत्सव' सुरु करण्याचे ठरले. हा उत्सव 24 ते 30 जानेवारी या काळात घेण्याचे ठरले. याच काळात 26 जानेवारी येत असल्याने या उत्सवाला अधिक महत्त्व प्राप्त होते.1951 पासून ही आगळीवेगळी यात्रा भरते. देशभरामध्ये महात्मा गांधी यांच्या नावाने यात्रा भरवणारे हे बहुदा पहिलेच आणि एकमेव गाव असावे.