सध्या उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका पडला असताना महाराष्ट्रात आता हळूहळू थंडी जाणवायला सुरूवात झाली आहे. मागील दोन दिवसांपासून नागपूर सह विदर्भामध्ये थंडीची लहर कायम असून सध्या राज्यातील निच्चांकी तापामान चंद्रपूरमध्ये नोंदवण्यात आलं आहे. चंद्रपूरात सर्वात कमी म्हणजे 5.1 अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मात्र सध्या ढगाळ वातावरण असल्याने पुढील 2 दिवस थंडीपासून राज्यातील लोकांना थोडा दिलासा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रात विदर्भात अनेक ठिकाणी तापमान 10 अंश पेक्षा कमी नोंदवण्यात आले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी म्हणजे ख्रिसमसला मुंबई, ठाणे सह काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी बसरल्या आहेत. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 31 डिसेंबर, 1 जानेवारी दिवशी मात्र विदर्भात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण मोकळं झाल्यानंतर पुन्हा थंडी जाणवायला सुरूवात होईल असा अंदाज आहे.
30 डिसेंबरला उत्तरेकडे पश्चिमीकडे थंड वारे वाहण्यास पुन्हा सुरूवात होईल त्यामुळे या वेळी पुन्हा राज्यातील थंडीचा पार खाली येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये थंडी कायम असल्याने तेथे पुढील काही दिवसांसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. उत्तर भारतामध्ये पुढील काही दिवसात पावसाचा अंदाज असल्याने त्याचा परिणाम वाहतूक सेवा आणि जनजीवनावर आढळून आला आहे.