Cold | Photo Credits: PTI

महाराष्ट्रात नोव्हेंबर मध्ये दिवाळीत थंडीची (Maharashtra Weather Update) चाहुल लागली होती. मात्र डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीस मुंबईतील (Mumbai) तापमान वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा थंडीची लाट येऊ लागली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात किमान तापमानात घट झालेली पाहायला मिळत असल्याची माहिती हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. मुंबईसह नाशिक (Nashik), परभणी (Parbhani), पुणे (Pune), जळगावमध्ये (Jalgaon) किमान तापमानात घसरण झाली आहे.

के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक मध्ये 11.1, परभणी 10.6, सांताक्रूज 18.4, जळगाव 12.6, बारामती 11.9, औरंगाबादेत 13.0 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.हेदेखील वाचा- Curfew in Alandi: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदीत 6 ते 14 डिसेंबर दरम्यान संचारबंदी होणार लागू

त्याचबरोबर राज्यातील अन्य जिल्ह्यातही ब-याच ठिकाणी तापमान अंशाच्या खाली गेले आहे. गोंदियात 10.5 तर नागपूरमध्ये 12.4 अंश सेल्सियस इतके किमान तापमान घसरले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला मुंबईसह अनेक जिल्ह्यात थंडीची चाहुल लागली होती. दिवाळीपर्यंत वातावरणातील हा गारवा कायम होता. मात्र दिवाळीनंतर ही थंडी एकाएकी कमी झाली. पण आता हळूहळू थंडीची लाट राज्यात पसरत आहे. या गुलाबी थंडीची सर्वच महाराष्ट्रवासिय आतुरतेने वाट पाहत होते.

यंदा राज्यात अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडला. त्यामुळे मुंबईतील पाणीकपातीचे संकट टळले. मात्र परतीच्या पावसाने अनेक जिल्ह्यांचे प्रचंड नुकसान केले. या परतीच्या पावसाचा फटका मुंबईच्या काही भागांना देखील बसला. त्यामुळे जितका चांगला पाऊस तितकीच चांगली थंडी पडते असे अनेकदा सांगितले जाते. त्यानुसार राज्यात छान गुलाबी थंडी पडायला सुरुवात झाली आहे.