Winter | Photo Credits Twitter

एकीकडे महाराष्ट्राच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत तर दुसरीकडे काही भाग गारठत चालला आहे. गेल्या 2 दिवसांपासून हवेत गारवा आल्याने महाराष्ट्रासह संपूर्ण मुंबईला (Mumbai) हुडहुडी भरली आहे. मुंबईत मंगळवारी रात्रीपासून किमान तापमान घसरले आहे. कमाल तापमानाचा पाराही बुधवारी सरासरीहून कमी होता. कमाल तापमान सरासरीहून सांताक्रूझ येथे 2.2 अंशांनी कमी, तर कुलाबा येथे 1.7 अंशांनी कमी होते. वायव्येकडून वाहणाऱ्या वाऱ्यांनी उत्तर महाराष्ट्रातही कमाल तापमानात घट नोंदवली आहे.

जानेवारी महिना उजाडला तरी मुंबईत म्हणावी तशी थंडीला सुरुवात झाली नव्हती. मात्र कुलाबा येथे मंगळवारी सरासरीहून दोन अंशांची घट नोंदवत किमान तापमान 17अंश नोंदवले गेले. वरळी येथे सर्वात जास्त म्हणजे 20.19 अंश किमान तापमानाची बुधवारी नोंद झाली. विद्याविहार, अंधेरी येथे 17 अंशांहून अधिक, तर वांद्रे-कुर्ला संकुल येथे 16.27 अंश सेल्सिअस किमान तापमान होते.

हेदेखील वाचा- Maharashtra Weather Updates: महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात निच्चांकी तापमान 5.1अंश; पुढील 2 दिवसात पावसाची शक्यता

वायव्येकडून वाहणाऱ्या वाऱ्यांनी उत्तर महाराष्ट्रातही कमाल तापमानात घट नोंदवली आहे. मालेगाव येथे सरासरी तापमानाहून कमाल तापमान 4.2 अंशांनी खाली उतरले आहे. मालेगावात 25.2 कमाल तापमानाची नोंद झाली, तर जळगावात 25.7 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले.

विदर्भाचा कमाल तापमानाच्या पाऱ्यात सरासरीपेक्षा घट झाली आहे. अमरावती येथे कमाल तापमान सरासरीपेक्षा 8.1 अंशांनी खाली उतरले. अमरावती येथे कमाल तापमान 20.6 अंशांवर पोहोचले आहे, तर किमान तापमान 13.6 अंश सेल्सिअस आहे. वर्धा येथेही सरासरीपेक्षा कमाल तापमानात 7.1 अंशांची घट होऊन हे तापमान 20.5 अंशांवर पोहोचले आहे. किमान तापमान 13.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.