Maharashtra Weather Forecast: मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची चिन्हे, मुसळधार पाऊस अपेक्षीत; जाणून घ्या हवामन अंदाज

अचानक गायब झालेला मान्सून पुन्हा एकदा हजेरी लावण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाने तसा अंदाज वर्तवला असून, अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Weather Forecast: मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची चिन्हे, मुसळधार पाऊस अपेक्षीत; जाणून घ्या हवामन अंदाज
Monsoon | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

अपेक्षीत वेळेपेक्षा बराचला लवकर दाखल झालेल्या यंदाचा मान्सून (2025) पदार्पणात दमदार कामगिरी करुन अचानक गायबच झाला. इतका की, त्याची अपेक्षीत वेळ आल्यावरही त्याने प्रभावी दर्शन दिले नाही. त्यामुळे मान्सून पाऊस गायब झाला की काय? अशी शंका घेतली जाऊ लागली. दरम्यान, भारतीय हवामान विभाग अर्थात आयएमडीने (IMD) हवामान अंदाज (Maharashtra Weather Forecast) वर्तवला. या अंदाजानुसार कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची चिन्हे असून, मुसळधार पाऊस बरसण्याचे भाकीत आहे. खास करुन आज (11 जून) सातारा, सांगली, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आयएमडीने या भागात आणि राज्याच्या उर्वरीत जिल्ह्यांना सुद्धा सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पाऊस दमदार परतणार?

आयएमडीने वर्तवलेला हवामान अंदाज सांगतो की, कोकण किनारपट्टीवर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस बरसू शकतो. तर कोकण विभागात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये दमदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. वेळेआधी आलेल्या मान्सूनचा काही आठवड्यांपूर्वीचा इतिहास विचारात घेऊन हवामानाच्या परिस्थितीनुरुप इशारा (अलर्ट) जारी करण्यात आला आहे.

प्रमुख जिल्हे आणि अलर्ट

यलो अलर्ट: पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, मुंबई आणि ठाणे

ऑरेंज अलर्ट: पालघर आणि रायगड

विभागनिहाय हवामान अंदाज

पश्चिम महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. खास करुन पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांमध्ये.

मराठवाडा विभागात मुसळधार पावसाचा इशारा पुढील चार ते पाच दिवसांसाठी देण्यात आला आहे. हा इशारा या विभागातील आठही जिल्ह्यांना लागू असेल.

कोकण किनारपट्टीलगत हलका ते मध्यम पाऊस अपेक्षीत आहे. तर ठाणे, मुंबई आणि रायगड या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विदर्भ विभागात हलक्या ते मध्य पावसाची उपस्थित पाहायला मिळू शकते. त्यातल्या त्यात चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पावसाचा जोर काहीसा अधिक राहिल. अमरावती आणि नगापूरमध्येही दमदार पाऊस अपेक्षीत आहे.

दरम्यान, मान्सून पुन्हा दमदारपणे सक्रीय होण्याची शक्यता असली तरी, राज्याच्या कृषी विभागाने मात्र सावध पवित्रा घेत शेतकऱ्यांना धीर धरण्याच्या सूचना दिल्या आहेत. मान्सूनची सुरुवात दमदार झाली असली तरी, तो मध्येच थांबला आहे. परिणामी शेतकऱ्यांनी मशागत करावी मात्र, बियाणे पेरु नये. पावसाचा पुढील अंदाज पाऊनच पेरणी करावी. अन्यथा दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते, असे कृषी विभागाने सावधपणे म्हटले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 11, 2025 09:56 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).