Maharashtra Weather Forecast: येत्या 2-3 दिवसांत मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता- IMD
Rains | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

काही दिवसांपूर्वीच आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) पश्चिम किनारपट्टीला चांगलच झोडपलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या 2-3 दिवसांत मध्य महाराष्ट्रातील (Madhya Maharashtra) घाट भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. अशी माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology) के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. (Monsoon 2021 Update: केरळ मध्ये यंदा मान्सून 1 जून ला दाखल होणार; हवामान खात्याचा अंदाज)

त्याचप्रमाणे पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद आणि जालना येथेही 24-25 मे दरम्यान हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच काही ठिकाणी मेघगर्जनेची देखील शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पाऊस बरसत असताना विदर्भ, मराठवाड्यात मात्र कोरडे वातावरण असण्याचा अंदाज आहे.

K S Hosalikar Tweet:

दरम्यान, लवकरच मान्सूनचे आगमन होणार आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. 1 जून रोजी केरळ तर 10 जून रोजी महाराष्ट्रातील तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर 10-20 जून दरम्यान मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अंदमानात मान्सून दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरल्याने केरळ आणि त्यानंतर महाराष्ट्रातही मान्सून वेळेवर हजेरी लावेल, अशी अपेक्षा आहे.