Representative Image

महाराष्ट्रामध्ये यंदाचा उन्हाळा सरासरी पेक्षा अधिक कडक असणार असल्याची माहिती आयएमडी (IMD) कडून देण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, एप्रिल ते जून हे उन्हाळ्याचे दिवस महाराष्ट्रासह भारतातही कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना यंदाही तीव्र उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. दरम्यान नुकताच आयएमडीने पुढील 3 महिन्याचा हवामान अंदाज सादर केला आहे.

आयएमडीच्या माहितीनुसार, उन्हाळ्याच्या दिवसात सकाळी आणि रात्री देखील तापमानाचा पारा हा सरासरी पेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळचा दक्षिण भाग या भागात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे तर इतरत्र देखील तापमान सरासरीच्या वर राहण्याचा अंदाज आहे. नक्की वाचा: Mumbai Rain Prediction: मुंबई मध्ये आज पावसाच्या हलक्या सरी बरसण्याचा अंदाज.

भारतामध्ये महाराष्ट्रासोबतच एप्रिल ते जून या दिवसांमध्ये मध्य, वायव्य, उत्तर आणि पूर्व भारतामध्ये उष्णतेच्या लाटा सरासरी पेक्षा अधिक तीव्र राहणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागामध्ये उष्णतेच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा 7-8 दिवस जास्त राहणार आहेत. एप्रिल महिन्यात कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात सरासरीइतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाज आहे.