Maharashtra Weather Forecast: राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज; पुढील 3 दिवस 'या' भागांना दमदार पावसाचा इशारा
Monsoon (Photo Credit: PTI/Representational Image)

मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीनंतर राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होणार आहे. बंगालच्या उपसागरापासून तमिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील 2-3 दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी दमदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकण (Kokan), मराठवाड्यात (Marathwada) काही ठिकाणी तर राज्याच्या बहुतांश भागात चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे.

परभणी, बीड, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात आज म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी मेघगर्जनेसह काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. याशिवाय कोकण, विदर्भ, मध्य माहाराष्ट्रातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Cyclone Shaheen: शाहीन चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीला धडकण्याची शक्यता कमी; मात्र अनेक राज्यात मुसळधार पावसाचा IMD चा इशारा)

3 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

4 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय कोकणात बहुतांश ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

ऑक्टोबर महिना उजाडल्याने आता परतीच्या पावसाला सुरुवात होईल. 6 ऑक्टोबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच मान्सूनचा परतीचा प्रवास वायव्य भारताच्या काही भागांतून सुरु होईल, अशी माहिती  के. एस. होसळीकर यांनी ट्विटद्वारे दिली. दरम्यान, गुलाब चक्रीवादळामुळे राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.