Maharashtra Weather Forecast For Tomorrow: महाराष्ट्रातील अनेक भागांना सध्या प्रचंड उष्णतेचा तडाखा बसत आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील तापमानाने 43 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. या सगळ्यात काही ठिकाणी वादळी वारे आणि पावसाने हजेरी लावली असली तरी, पुढील एक-दोन दिवसांत हवामानात घट होण्याची शक्यता कमी आहे. कोकण आणि सिंधुदुर्गात सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसाने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा दिला, मात्र पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, मध्य महाराष्ट्रात अजूनही सूर्य आग ओकत आहे. महाराष्ट्रातील उद्याचे हवामान पाहता, अनेक ठिकाणी हवामान उष्ण असेल आणि तापमान 30-35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल.
पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34°C आणि 28°C च्या आसपास असेल. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग), हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज अकोला येथे 45.8°C कमाल तापमानाची नोंद झाली, सांगली व कोल्हापूर येथे 24.3°C हे सर्वात कमी किमान तापमान होते.
जाणून घ्या उद्याचे हवामान-
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपुर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या ठिकाणी हवामान कोरडे व उष्ण राहील.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस/विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
अकोला, चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
दुसरीकडे, गुजरात आणि उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यातून सुटणाऱ्या वाऱ्यांमुळे तसेच उत्तर-पश्चिम दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उत्तर-मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. (हेही वाचा: Mumbai Water Cut Update: मुंबईकरांनो सावधान, शहरात 'या' तारखेपर्यंत प्रशासनाकडून पाणीकपातीचा निर्णय)
दरम्यान, नैऋत्य मान्सून 31 मे पर्यंत केरळमध्ये पोहोचेल. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून मुंबईत दाखल होऊ शकतो. मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानामुळे अस्वस्थता जाणवू शकते. सध्या तापमान जास्त नाही, मात्र आता पावसाळा जवळ येत असल्याने हवेतील आर्द्रता वाढली आहे.