महाराष्ट्र: 'कौमार्य चाचणी' आता ठरणार दंडनीय गुन्हा, कंजरभाट सह अनेक समुदयांमधील नववधूंना द्यावी लागणारी Virginity Test ठरणार लैंगिक अत्याचार
Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रामध्ये आता तरूणींकडे 'कौमार्य चाचणी'(Virginity Test)ची मागणी करणं हा दंडनीय गुन्हा ठरणार आहे. बुधवारी कौमार्य चाचणी हा लवकरच दंडनीय अपराध ठरणार या बाबतच्या कायद्यावर सरकार विचार करत असल्याचं वृत्त मिळालं आहे. गृह राज्यमंत्री रणजित पाटील (Ranjeet Patil) यांनी बुधवारी काही सामाजिक संघटनांची भेट घेऊन हा निर्णय घेतला आहे. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे देखील या मिटिंगमध्ये सहभागी होत्या.

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अजुनही काही जाती-जमातींमध्ये तरूणींना विवाह ठरवताना आणि तो मान्य करून घेण्यासाठी त्या कुमारिका (Virgin)असल्याचं पटवून द्यावं लागत. महाराष्ट्रामध्ये कंजरभाट (Kanjarbhat Community) आणि अन्य समुदयातील तरूणींना 'कौमार्य चाचणी' ला सामोरं जावं लागत. काही दिवसांपूर्वी तरूणांनी एकत्र येऊन या प्रकाराविषयी ऑनलाईन अभियान सुरू केलं होतं. Virginity Test: पुढारलेल्या पुण्यात पुन्हा एकदा नववधूंची ‘कौमार्य’चाचणी; शहरातील उच्चभ्रू परिसरातील घटना

रणजित पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हर्जिनिटी टेस्ट हा आता लैंगिक अत्याचाराचा प्रकार मानला  जाणार आहे.

लवकरच सरकार न्याय आणि विधी विभागाच्या मदतीने एक सर्किल्युर/ अधिसूूचना काढणार आहे. त्यामध्ये हा दंडनीय अपराध असल्याची माहिती दिली जाणार आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाच्या चेअरपर्सन रेखा शर्मा यांनी महाराष्ट्राच्या महिला आणि बाल कल्याण विकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे लेखी पत्रव्यवहार करून या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली होती.