Virginity Test: पुढारलेल्या पुण्यात पुन्हा एकदा नववधूंची ‘कौमार्य’चाचणी; शहरातील उच्चभ्रू परिसरातील घटना
Virginity test in Pune | (Photo courtesy: archived, edited images)

भलेही पुणे (Pune) हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जात असेल. अलिकडील काळात तर आयटी इंडस्ट्री वाढल्याने पुण्याची ओळख हायटेक पुणे अशी झाली असेल. पुण्याने विज्ञान युगाची कास कितीही धरली असली तरी, मानवतेच्या दृष्टीने अत्यंत अपमानास्पद असलेल्या रुढी, परंपरांची मगरमिठी पुण्याला आजही सोडविता आली नाही. कोरगाव पार्क (Koregaon Park) या पुण्याच्या अत्यंत हायप्रोफाईल (High Profile Area) समजल्या जाणाऱ्या परिसरात दोन नववधूंची 'कौमार्य' चाचणी (Virginity Test) घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. धक्कादायक म्हणजे ज्या वधूंसोबत हा प्रकार घडला त्या वधूंचे (Bride) आणि वरांसह (Bridegroom) असे दोन्हीकडील कुटुंबीय ही अतिशय उच्चशिक्षीत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात कजारभट समाजातील नववधूंसोबत हा प्रकार 21 जानेवारी रोजी घडला. या घटनेतील वर आणि वधू तसेच त्यांच्या कुटुंबातील जवळपास सर्वच जण हे अतिशय उच्चशिक्षित आहेत. असे असतानाही हा प्रकार घडला. विवाह सोहळा पार पडताच काही वेळातच नववधूंना कौमार्य चाचणीला सामोरे जावे लागले. ही चाचणी पार पडल्यानंतर जातपंचायतीतील काही मंडळींनी वरास अनेक प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. यात काही प्रश्न अत्यंत नाजूक आणि मनात संचोक निर्माण करणारे होते, असे समजते. (हेही वाचा, कौमार्य चाचणी विरोधात लढणारी ऐश्वर्या येताच दांडीया बंद, निघून जाता पुन्हा सुरु)

अधिक माहिती अशी की, वराचे पालक हे नंदुरबार येथील न्यायालयातील निवृत्त अधिक्षक आहेत. तर, वधू ही पुण्यातील राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याची पुतणी आहे. ही कुटुंबं कजारभट समाजातील आहेत. हा विवाह 21 जानेवारी रोजी पुण्यातीलच कोरेगाव पार्क परिसरात पार पडला. एकूणच काय तर, या प्रकरणातील दोन्हीकडील कुटुंबं ही उच्चशिक्षितच नव्हे तर, सामाजिक मानमरातब मिळवणारी आहेत. असे असातानाही असा प्रकार घडावा याबाबत नाराजी आणि आश्चर्य अशा दोन्ही भावना व्यक्त होत आहेत. विशेष म्हणजे पुणे शहरात गेल्याच महिन्यातही अशाच प्रकारची घटना घडली होती.