Sanjay Raut Shahji bapu Patil \ X

महाराष्ट्रामध्ये आता विधानसभा निवडणूकीसाठी प्रचाराला सुरूवात झाली आहे. आज अधिसूचना जारी झाल्याने अर्ज भरण्याला सुरूवात होत आहे. या पार्श्वभूमीवर काल रात्री खेड-शिवापूर टोल नाक्यावर एका गाडीमध्ये पॅकबंद बॉक्समध्ये पाच कोटी रुपयांची रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे. राजगड पोलिसांकडून रक्कम हस्तगत करण्यात आली असून त्यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे. यामध्ये पोलिसांसोबतच निवडणूक विभागाचे अधिकारी, प्रांताधिकारी आणि आयकर विभाग अधिकारी देखील आहेत. या प्रकरणी संजय राऊत यांनी ट्वीट करत शहाजी बापू पाटील यांना लक्ष्य केलं आहे.

संजय राऊत यांचं ट्वीट

शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी X वर पोस्ट करत शिंदे गटावर निशाणा साधला आहे. त्यांनी 'मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास ७५ कोटी पाठवले

१५ कोटी चा हा पहिला हप्ता!' म्हणत शाहाजी बापूंना प्रश्न विचारला आहे. शहाजी बापू पाटील हे सांगोला चे आमदार आहेत. या आरोपांवर उत्तर देताना शाहाजीबापूंनी याप्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही असं म्हणून आरोप फेटाळले आहेत. तर राऊतांना सत्ता गेल्यापासून झोपताना झाडं आणि उठताना डोंगर दिसत आहेत अशी टीपण्णी केली आहे.

दरम्यान मीडीया रिपोर्ट्सनुसार, सापडलेले पैसे हे कॉन्ट्रॅक्टरचे असल्याचे त्याने म्हटलं आहे. सध्या या कॉन्ट्रॅक्टरची चौकशी सुरू आहे. 4  जणांना सध्या  ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणामध्ये अधिक माहिती समजू शकलेली नाही. गाडी सांगोल्यतील अमोल नलावडे यांच्या नावावर आहे.