राज्यभरात गेले दोन आठवडे सतत मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे मुंबईत भाजीपाल्याचा पुरवठा कमी झाला आहे. गेल्या पंधरवड्यात भाज्यांचा पुरवठा घटल्याने बहुतांश भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, किमान दोन आठवडे भाजीपाल्याच्या चढ्या भावापासून दिलासा मिळणार नाही. जूनच्या मध्यापासून भाज्यांचे दर वाढण्यास सुरुवात झाली आणि जुलैमध्ये राज्यभर मुसळधार पाऊस पडल्यानंतर ही वाढ कायम राहिली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक गावांमध्ये पाणी साचले आहे तसेच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे आजूबाजूच्या खेड्या-पाड्यांमधून शहरात वाहने येत नाहीत. एपीएमसीचे व्यापारी संजय पिंगळे म्हणाले की, सध्या फक्त लहान वाहने येत आहेत परंतु त्यात भाजीपाला कमी प्रमाणात आहे. वाशी येथे असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली, पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकातील इतर ठिकाणांहून भाजीपाल्याचा पुरवठा होतो.
20 जुलै रोजी एपीएमसीला भाजीपालाने भरलेली एकूण 450 वाहने मिळाली. मात्र, त्यापैकी बहुतेक लहान पिकअप व्हॅन किंवा टेम्पो होते ज्यात कमी प्रमाणात उत्पादन होते. वाशी येथील मुंबई एपीएमसीमध्ये दररोज भाजीपाला भरलेली सुमारे 500 ते 550 वाहने येतात. मात्र, जूनच्या मध्यानंतर पुरवठा 435-450 वाहनांवर आला असून, त्यापैकी 300 वाहने ही लहान पिकअप व्हॅन आहेत. (हेही वाचा: विदर्भातील 1.35 लाख हेक्टरवरील उभ्या पिकाचे पुरामुळे नुकसान, उपमुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांची माहिती)
एपीएमसीच्या एका प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले की, ‘एकूण पुरवठा सुमारे 40 ते 50 टक्क्यांनी कमी झाला आहे. पुरवठा कमी झाल्यामुळे काही भाज्यांच्या किमती 60 ते 100 टक्क्यांनी वाढल्या आहेत.’